दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उद्यापासून टेल टू हेड चालणार - आ. संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उद्यापासून टेल टू हेड चालणार – आ. संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायीनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उद्या (ता.३) पासून सुरू होणार असून, हे आवर्तन टेल टू हेड या पद्धतीने चालेल अशी माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

सध्या उजनी धरणामध्ये जवळपास 80 टक्के पाणीसाठा असल्यामुळे व दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आवश्यक तेवढा पाऊस नसल्यामुळे, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हे आवर्तन सुरू केलेले आहे, या आवर्तनाच्या पाण्यामधून शेतकऱ्यांनी आपले तलाव, नाले ,बंधारे भरून घ्यावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.


सायफण दिसल्यास गुन्हा दाखल करणार – उपअभियंता संजय अवताडे यांची माहिती…
दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टप्पा 1 व टप्पा 2 यांच्या मुख्य कालवा व वितरिकेवर अनेक शेतकरी सायफणद्वारे पाणी घेत आहेत. सायफणद्वारे हे पाणी घेणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई या प्राधिकरणाच्या कायद्यानुसार नियमबाह्य असून जे शेतकरी असे सायफणद्वारे पाणी घेतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक 12 चे अभियंता संजय अवताडे यांनी दिली. सायफण काढणे संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायतीला यापूर्वीच नोटीस दिलेली आहे. त्याबरोबरच वर्तमानपत्रामधून प्रसिद्धीकरणही केलेले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सोशल मीडियामधून सायफण काढणे विषयी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःहून मुख्य कॅनॉलमधील सायफण काढावेत व आपल्यावरील होणारी कारवाई टाळावी असे आवाहन संजय अवताडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!