जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत विश्वजीत साळुंकेची चमकदार कामगिरी

करमाळा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत एमआयटी विश्वशांती गुरुकुल, पंढरपूर येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी विश्वजीत अमरजीत साळुंके याने जलतरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले आहे.
सोलापूर जिल्हास्तरावर आयोजित स्पर्धेत विश्वजीतने १७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात प्रथम क्रमांक, तर ५० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या वॉटरपोलो प्रकारातही प्रथम क्रमांक मिळविला.
विश्वजीतचे मूळ गाव सातोली (ता. करमाळा, जि. सोलापूर) आहे. त्याच्या या यशाबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, एमआयटी विश्वशांती गुरुकुल, पंढरपूरचे संस्थाचालक, मुख्याध्यापक गवळी, क्रीडा शिक्षक, साळुंके परिवार तसेच करमाळा आणि पंढरपूर परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांसाठी विश्वजीतला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
