गरीबी हटविण्याचा मंत्र!
गरीबी हटविण्याचा मंत्र असतो का..? असा प्रश्न सर्वांना पडतो. माझं मत नक्की आहे की ही अंधश्रध्दा नाहीतर वास्तवता आहे. हा लेख वाचला की त्याचे उत्तर तुम्हाला समजेल.
जो गरीब माणूस आहे तो अधिक गरीब होत असून श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत बनत चालला आहे. गेल्या शेकडो वर्षाची परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. देश स्वतंत्र झाला तरीही गरीबाची गरीबी ही कायम राहिली आहे. आजही आपल्या देशातील १५.२ टक्के लोक अर्धपोटी राहूनच झोपतात. वॉशिंग्टन येथील इंटरनॅशनल फूड पॉलीसी रिसर्च इन्स्टीट्यूटने (आयएफपीआरआय) जारी केलेल्या ग्लोबल हंगर इंडेक्स या अहवालात ११८ देशाच्या सुचित भारताचा ९७ वा क्रमांक येतो. भारतातील १५.२ टक्के लोकांना पोटभर जेवायला मिळतच नाही. ते जसे मिळते तसे अन्न अर्धपोटी खाऊनच झोपतात. शासनाने काहीच प्रयत्न केले नाहीत का..? केले आहेत. खुप प्रयत्न केले पण शासन पातळीवर. पण शासनाला मर्यादा आहेत. शासन जनहिताचे निर्णय घेते, राबवते पण प्रत्येक कुटुंबासाठी शासनाचा माणूस प्रत्येक कुटुंबाच्या घरी येवून गरीबी दूर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वतःचा विकास स्वतः करावा लागतो. धोरण आखणं, योजना काढणं व त्याची अंमलबजावणी करणं ही बाब शासनाची; पण त्या योजनांचा लाभ घेवून प्रगती करणं हे आपलंच काम आहे.
कवी सुरेश भट म्हणतात.. ” आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोयस काय वेड्या ? लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे.. उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. जीवनाचं गणितच फार वेगळे आहे.”
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गरीब म्हणजे किती रक्कम असलेला माणूस गरीब व किती रक्कम असलेला श्रीमंत अशी व्याख्या जगात तरी कोणी केली नाही. जो दोन वेळचे अन्न सुखाने खातो, मूलांना चांगले शिक्षण देऊ शकतो, वेळच्या वेळी घरातील लोकांना कपडे
घेऊ शकतो. निदान ऐपती नुसार रहायला स्वतःचे घर आहे, फिरायला गाडी आहे व डोक्यावर कोणाचे कर्ज नाही, कसायला शेती किंवा गरजेऐवढे उत्पन्न मिळवण्याजोगी नोकरी किंवा व्यवसाय आहे. अशा सर्वसाधारण गोष्टी असल्या की तो श्रीमंतच. कारण अब्जाधीश असलातरी
तो त्याच्या पैशातून यापेक्षा जास्त आपल्या कुंटूंबासाठी काही करत नाही. एवढ्याही आवश्यक गोष्टी नसतील तर तो गरीब समजावा. अन्यथा दोन जणांची तुलना केली त्यात एक गरीब वएक श्रीमंत असतो. तशी गरीबी ही सर्वच क्षेत्रात असते, हे आपण विसरतो. उद्योजक मुकेश
अंबाणीचा विचार केला तर अन्य उद्योजक गरीब असतात. उद्योजकाचा विचार केलातर त्यातील मॅनेजर गरीब, मॅनेजरचा विचार केला तर कामगार गरीब असतात, मालकापेक्षा ठेकेदार गरीब आणि ठेकेदारापेक्षा मजुर गरीब. या टप्प्यातील प्रत्येकाला आपल्या गरीबीचे शल्य असते. अनेकवेळा दुसऱ्याची श्रीमंती पाहून आपण दुःखी होतो. त्यातूनच काहीजण धास्ती घेतात, काहीजण आत्महत्या करतात, तर काहीजण घर सोडून पळून जातात.
एकजण म्हणतो.. कभी तानोमे कटेगी, कभी तारीफोमे कटेगी.. ये जिंदगी यारो पल पल घटेगी… यहाँसे कुछ लेना नही, यहाँसे कुछ पाना नही फिर भी क्यों चिंता करते हो.. उसीसे तो खुबसुरती घटेगी… ये जिंदगी यारो पल पल घटेगी!
नको गोष्टीचा विचार यातून जीवनावर विपरीत परिणाम होतो, हे विसरून चालणार नाही. पुर्वी यादृष्टीने लक्ष्मीची खुप सुंदर कथा सांगितलेली आहे. एकदा लक्ष्मीचे स्वयंवर होते. सारे देव-दानव मोठ्या संख्येने व अपेक्षेने सभामंडपात आले होते. या मंडपात लक्ष्मीने पतीसाठी ‘पण’ जाहीर केला नव्हता. लक्ष्मी सभा मंडपात आली आणि म्हणाली.. ‘ज्याला माझी इच्छा नसेल त्यालाच मी वरमाळ घालणार आहे.’ ते तर सर्वजण अपेक्षेने आले होते. त्या सर्वाला लक्ष्मीने डावलले, त्यानंतर लक्ष्मीने ज्याला लक्ष्मीची अपेक्षा नाही अशाचा शोध घेत निघाली. शेवटी तीला शेषावर पहुडलेले भगवान विष्णू दिसले, त्यांच्या गळ्यात तीने वरमाळ घातली व त्यांची पत्नी बनून ती सेवा करीत बसली. म्हणून म्हणतात.. ‘न मागे तयाची रमा होय दासी’ थोडक्यात काय तर लक्ष्मी आपणाला मिळेल अशी अपेक्षा करून बसलेल्या देव-दानवाला निराश व्हावे लागले होते. तशी स्थिती समाजात फक्त संपत्तवीर लक्ष ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या पदरी निराशा पडते.
सतत एका विचाराने कार्यरत राहिलातर जीवन जगणे तर सुलभ जातेच पण यश हमखास मिळते. अनेकवेळा आपण काही गोष्टी मनात ठरवतो पण प्रयत्न करत नाही. स्वप्न पाहिली पाहिजेत व ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. केवळ नशिबावर भरवसा ठेवून वाटचाल केलीतर
चाणक्याने म्हटले आहे. ‘राजा वेश्या यमश्चान, स्वस्करो बाल याचकौ । परदुःख न जापन्ति अष्टमो ग्रामकण्टकः ॥’ राजा (राजकर्ते) वेश्या, अग्नी, यम, बालक, याचक, चोर आणि कंटक या आठ लोकांना दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा नसते. सरकार काही देईन, अशी अपेक्षा ठेवलीतर ती फोल जाते. मनुष्य म्हणून आपली काही जबाबदारी आहे. मनुष्य इतर प्राण्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे. जो कोणत्याही संकटावर मात करू शकतो तोच खरा मनुष्य म्हटला जातो. “आहार निद्रा भयः मैथुनानि, समानि चैतिनि नृणां पशुनाम। ज्ञानं नारायणधिको विशेषो, ज्ञानेन हीना: पशुभी समानः ॥” माणूस व पशू ह्यांचा आहार, झोप, भय, आणि समागम या सारख्या गोष्टी आहेत, फरक असतो तो बुध्दीचा, माणसाजवळ बुध्दी असते, बुध्दी वापरत नसलेला माणूस पशूवत असतो. म्हणजे जेंव्हा जेंव्हा काही अडचणी येतील तेंव्हा त्यावर मात करत पुढे गेले पाहिजे.
एक कथा आहे. नदीतील एका डोहात अनेक मासे होते पण त्यापैकी तीन मासे एकमेकाचे मित्र होते. एक दिवस दोन मासे फिरावयास गेले व एकजण त्याच डोहात थांबला होता. थोड्यावेळा नंतर तेथे एक कोळी आला व तो म्हणाला येथे बरेच मासे आहेत, उद्या येथे येवू व जाळे टाकून मासे पकडू. हे डोहात थांबलेल्या माशाने ऐकले. आपले मित्र फिरून आल्यावर त्यांना ही हकीकत सांगितली. एकजण म्हणाला.. कोळी म्हटला म्हणून लगेच येत नाहीत, आलेतर ऐनवेळी पाहू. दुसरा म्हणाला.. कोळी येणार नाही व जर आलेतरी नशीबाच्या पुढे काही नाही. ते येवू नाहीतर नाही जे नशीबात असेल ते होईल, तू निश्चत्त रहा. पण ज्याने स्वत: सर्व ऐकले त्याला मात्र झोप येईना, तो मित्रांचा निरोप घेऊन दुसऱ्या डोहाकडे गेला. दुसऱ्या दिवशी कोळी आले, त्यांनी जाळे टाकले इतर माशाबरोबर त्याचे दोघेही मित्र सापडले. या दोघापैकी पहिला मासा हूशार होता, त्याने श्वास कोंडून घेतला व मेल्याचे सोंग घेतले. कोळ्याने मेला म्हणून उचलून बाजूला फेकला, त्यांने लगेच उडी मारून तो पाण्यात गेला व वाचला पण तिसरा नशीबावाला कोळ्याच्या घरी गेला. पहिला अगोदरच गेला तो सुखरूप वाचला. सांगायचे तात्पर्य संकट येत असल्याची चाहूल आल्यानंतर हात पाय
गळून चालत नाहीतर त्यावर पर्याय शोधला पाहिजे.
जीवनात प्रत्येक व्यक्तीचे संकट वेगळे असते, पण संकट हा शब्द महत्वाचा आहे. त्यावर मात करण्यासाठी योग्य निर्णय व त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असते. गरीबी हे सुध्दा संकट असते पण त्यातच यशाची संधी दडलेली असते. माझा एक वीर नावाचा मित्र दहावीतूनच घरी राहिला. घरी शेती चांगली नव्हती तो दुसऱ्याच्या शेताला कामाला जात
असते. पगार कमी पडत असे. मग तो करमाळ्याला कामाला येत होता. पगार जरा चांगला मिळत असे. मग त्यांनी आपल्याबरोबर काम करणाऱ्यांचे संघटन केले व उक्तीच कामे घेऊ लागला. मजूरांना चांगला पगार देत असे आणि त्याचा चौपट पगार तो मिळवत असे. त्यातूनच तो मोठा ठेकेदार झाला. थोडक्यात गरीबीवर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.त्यासाठी दोन बाबी महत्वाच्या आहेत. एक ‘जो पसंत है, उसे हासील करो। नहीं तो जो हासील है उसे पसंद कर लो।’ जे आपल्याला उपलब्ध आहे, त्याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे.
लता करे या अज्जी पतीच्या उपचारासाठी बारामतीला आल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पाच हजार रूपयाची गरज होती. गाव तर दुर, पैसे मिळणारे माध्यम नव्हते.
त्यांना बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा समजली. पाच हजार रूपयाचे बक्षीस म्हटल्यावर त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. त्यांना ना वेगळा ड्रेस ना बुट. नऊवारी साडीवर त्या पळाल्या. पळताना चप्पल तुटली. तेथेच सोडली. त्या पळत होत्या लोक चिअरप देत होते व बघता बघता, त्यांनी ती मॅरॅथॉन जिंकली. त्यांच्यावर चित्रपट निघाला. सांगायचे तात्पर्य म्हणजे जेंव्हा एखादे यश मिळवायचे असेलतर हातात काय आहे हे न पाहता जे मिळेल ते शस्त्र घेऊन संघर्ष केला पाहिजे पदरी अपयश आल्याशिवाय रहात नाही. आणखी एक म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहिलातर आपली प्रगती होवूच शकत नाही. कारण दुसऱ्याला आपली प्रगती व्हावी असे वाटण्याचे कारण नाही.
आपल्या करमाळा तालुक्यातील नागराज मंजुळे, बालाजी मंजुळे या दोघा बंधुचा
प्रवास कितीतरी प्रतिकुल परिस्थितीतून झाला, पण त्यांनी उच्च यश मिळवले. तालुक्यातअनेक व्यावसायीक आहेत, जे शुन्यातून लढत होते व ते यशस्वी झाले. म्हणजे आपण आपले उद्दीष्ट ठरवून प्रयत्न केलातर त्यात यश मिळते. काहींना लवकर तर काहींना उशीरा यश मिळते पण मिळते हे विसरून चालत नाही. सर्वात शेवटी म्हणजे रामदास स्वामी म्हणतात.. ‘जगी सर्व सुखी कोण आहे’ थोडक्यात कितीही मिळाले पण मनात समाधान नसेलतर त्या जगण्याला अर्थ रहात नाही. म्हणून जे मिळाले त्यात समाधान मानण्याची कला प्राप्त असेलतर त्या जगण्याला वेगळाच अर्थ असतो, एक सुंगध असतो. असे सुंगधीयुत्तजीवन जगण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागत नाही; पण थोडे नियम पाळलेतर गरीबी संपवण्याचा मंत्र प्राप्त होते. योग्य आहार, योग्य व्यायाम, निर्व्यसनी जीवन, इतरांना समजून घेण्याची कला, नम्रता, सातत्य, चिकाटी व मिळेल त्यात समाधान पण पुढे त्यापेक्षा जास्त मिळवण्याची जिद्द हवी. बरस गरीबी संपलीच समजा..!
✍️डॉ.अॅड.बाबूराव हिरडे , करमाळा, मो.९४२३३३७४८०