गुणवत्तेची ऐशी तैशी!

0

“सध्याची गुणदानाची पद्धती बघता आपल्या देशातून इतर देशातच नाही तर परग्रहावर टॅलेंटेड लोक एक्सपोर्ट करावे लागतील.. ज्याप्रमाणे सगळीकडे हुशार विद्यार्थी दिसत आहेत त्याप्रमाणे फंडामेंटल रिसर्च चा अभाव सुद्धा आहे…. हे म्हणजे एखाद्या दिवाळखोर देशाच्या चलनी नोटांप्रमाणे झाले…. खिशात लाखभर रुपये पण बाजारात मूल्य शून्य….” अशा प्रकारची वास्तवदर्शी ही पोस्ट आहे पुणे येथील वृद्धी सॉफ्टवेअरचे गुरुवर्य श्री जितेंद्र लाड सरांची.

मुळातच इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि सगळीकडे 90, 95, 98 अशा टक्केवारीची मुलेच मुले दिसू लागली. यंदा 100 पैकी शंभर टक्के गुण मिळालेले एकूण 200 विद्यार्थी आहेत म्हणे. म्हणजे एकूणच सर्व दिशेला टॅलेंटेड विद्यार्थी दिसू लागले आहेत. पण खरंच ते टॅलेंटेड आहेत का? याचाही विचार शिक्षणतज्ज्ञांनी करायला हवा.

सध्याची परीक्षा पद्धती ही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनेशी जास्त खेळते. त्यामुळे आपल्या पाल्याला 80-90% मिळाले म्हणजे पालकांनी हुरळून जाऊ नये. मुलांची ही टक्केवारी वाढण्यासाठी काही बाबी कारणीभूत आहेत.



इयत्ता दहावीची परीक्षा ही फक्त पाठांतराची परीक्षा असते. यात विद्यार्थी विषयवस्तू समजून न घेता फक्त पाठांतरावर भर देऊन पेपर देतात. त्यामुळे ज्यांचे पाठांतर चांगले त्यांना गुण मिळतात.

चुकीची परीक्षा पद्धती हे दुसरे कारण आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांवर दिलेला भर, उताऱ्यातच शोधली जाणारी उत्तरे, सामान्य असणारी कठीणता पातळी आणि कसाही करून विद्यार्थी पास व्हावा यासाठी बोर्डासकट साऱ्यांचे होणारे एकत्रित प्रयत्न यामुळे गुणवत्तेपेक्षा गुणांना महत्त्व मिळते.



शिक्षकांच्या हातातील प्रत्येक विषयाचे 20 गुण काहीही अभ्यास न करता विद्यार्थ्याला सहज दिले जातात. भाषा विषयात 105 गुण मिळाले की विषय सुटतो. गणित-विज्ञान मिळून 75 गुण मिळाले की विद्यार्थी नापास होत नाही. यातले 40 गुण तर शिक्षकांनी दिलेले असतात.

थोडक्यात इंग्रजीसारख्या विषयात लेखी परीक्षेत 80 पैकी सात गुण मिळाले तरी विद्यार्थी आरामात पास होतो. कारण शाळेने त्याला तोंडी वीस गुण दिलेले असतात. त्यामुळे त्या विषयाची टोटल 27 होते व त्याचा विषय निघतो.

बेस्ट ऑफ फाईव्हमुळे विद्यार्थ्याला सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांत अधिक गुण आहेत त्याचाच विचार करून टक्केवारी काढली जाते. त्यामुळे मुलांची टक्केवारी वाढलेली दिसते.

उच्च माध्यमिक युनिट चालले पाहिजे हा देखील या पाठीमागचा हेतू असावा. त्यामुळे परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानाची न राहता तो येनकेन प्रकारे कसा पास होईल याची होते.



बरोबर उत्तराला पूर्ण गुणदान केले जाते. पूर्वी उत्तरे ब्रॉड स्वरूपात असायची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कितीही चांगले लिहिले तरी त्यांना पूर्ण गुण दिले जात नव्हते. त्यामुळे मार्कांचा फुगवटा दिसून येत नव्हता. एखाद्या विद्यार्थ्याला फर्स्ट क्लास मिळाला तरी त्याकडे आदराने पाहिले जायचे. आता या गुणदान पद्धतीमुळे सुमार वकुबाच्या विद्यार्थ्यालाही 90 च्या पुढे गुण मिळतात. त्यात त्याच्या बुद्धिमत्तेचे, स्वमताचे, उत्तराच्या स्वरचनेचे कोणतेही कौशल्य दिसून येत नाही. अपवाद असतात, पण ही बाब विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू शकते.

बऱ्याचदा अशी नव्वदीच्या पुढे गुण मिळवलेली मुले बारावीत नापास झालेली दिसून येतात ती यामुळेच.

या पाठांतरीत गुणांमुळे पालकांच्या अपेक्षा वाढतात व त्यांना कोटा, लातूर व अन्यत्र खूप सारे पैसे भरून मोठ्या अपेक्षेने पाठवले जाते. पण तो अभ्यास पूर्ण वेगळा असल्याने या मुलांना तो पेलवताना दिसत नाही.

त्यामुळे बऱ्याच अंशी अशी मुले निराशेच्या गर्तेत गेलेली दिसून येतात. पालक सुद्धा खूप पैसे खर्च केले म्हणून ओरडत राहतात.



बऱ्याचदा अशी नव्वदीच्या पुढे गुण मिळवलेली मुले बारावीत नापास झालेली दिसून येतात ती यामुळेच.

या पाठांतरीत गुणांमुळे पालकांच्या अपेक्षा वाढतात व त्यांना कोटा, लातूर व अन्यत्र खूप सारे पैसे भरून मोठ्या अपेक्षेने पाठवले जाते. पण तो अभ्यास पूर्ण वेगळा असल्याने या मुलांना तो पेलवताना दिसत नाही.

त्यामुळे बऱ्याच अंशी अशी मुले निराशेच्या गर्तेत गेलेली दिसून येतात. पालक सुद्धा खूप पैसे खर्च केले म्हणून ओरडत राहतात.



त्यामुळेच कोणी पालक आपल्या पाल्याचे गुणपत्रक अभिमानाने सोशल मीडियात फडकावत असेल तर अशा पालकांची कीव येते.

वरील सर्व कारणांमुळे मुलांची टक्केवारी वाढते. त्यांचे गुण वाढतात पण गुणवत्तेचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. गुण मिळाले म्हणून गुणवत्ता असेलच असे नाही आणि ही गुणवत्ता वाढवण्यासाठी कोणतीही शाळा, शिक्षक (माझ्यासकट), पालक प्रयत्न करताना दिसत नाहीत. सर्वजण फक्त विद्यार्थ्यांचे गुण वाढवण्याच्या मागे आहेत. ही बाब समाजस्वास्थ्याच्या आणि एकूणच विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या बाबत गंभीर आहे.



आता एवढे सारे गुण मिळाल्यावर पालकांच्या अपेक्षा वाढतात. त्यामुळे या वाढलेल्या अपेक्षांचे बर्डन त्या विद्यार्थ्यावर पडते. मग खूप सारे पैसे भरून महागड्या अकॅडमीला त्याला पाठवले जाते. त्याच्याकडे जर ओरिजनल गुणवत्ता असेलच तर तो पुढच्या स्पर्धेत टिकतो. पण सूज आलेली अशी गुणवत्ता असेल तर तो अपेक्षांच्या ओझ्यात बुडून जातो.

आताचे गुण आणि पूर्वीचे आपले गुण याचा विचार करता आपल्याला मिळालेल्या गुणांची यांच्या गुणाशी तुलना करतात आपण अक्षरशः ढ आहोत. आपल्या वेळेस बोर्डात येणारा विद्यार्थी 85% च्या आसपासचा असायचा. परीक्षेत फुकटचे गुण नव्हते. खूप मोठी डिस्क्रिप्टिव्ह उत्तरे लिहावी लागायची. त्यासाठी प्रॉपर पुस्तकाचा कसून अभ्यास करावा लागायचा. आता हे सारे काही राहिले नाही. बोर्ड गुण देते, आपण घेतोय. पण पुढच्या शर्यतीत या सुजलेल्या गुणांमुळे आपण मागे पडतोय, मुलं मागे पडतात. त्याचे काय? याचा विचार कोणीच करीत नाही. फक्त 90, 95, 96 मिळाले म्हणून आपल्या पाठी आपणच थोपटून घेतोय इतकंच.



आताच्या मुलांमध्ये अवांतर वाचनाचा अभाव आहे. त्यामुळे दर्जेदार पुस्तकांशी त्यांची ओळख क्वचितच होते. या सर्व गोष्टींमुळे सृजनशीलता, स्वविचार या गुणांचा विकास होताना दिसत नाही. परीक्षा सुद्धा गुणकेंद्रित आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नांत कसे गुण घ्यायचे याचेच मार्गदर्शन करणारी केंद्रे गावागावांत उभी राहिली आहेत. आपण काय लिहिलेय याचा अर्थही पोरांना माहीत नसतो. पेपरमध्ये फक्त रट्टा मारून लिखाण केले म्हणजे झाले आणि अशा रट्ट्यालाच गुण दिले जातात.



उदाहरणच द्यायचे झाले तर शाळेत रोज संविधान म्हणायला लावले जाते. मुलं ते म्हणतात — “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष…” हे संविधान त्यांचे तोंडपाठ असते. पण त्याचा अर्थ किती विद्यार्थ्यांना माहित आहे? विद्यार्थी सोडाच, पण किती शिक्षकांनाही याचा अर्थ माहित आहे? उलट ते पाठ आहे. परीक्षेत छानपैकी लिहिले की गुण मिळतात, एवढेच त्यांच्या दृष्टीने पुरेसे असते.

काही विचारवंत सध्या “जेन झी”चा जमाना आहे म्हणून गळे काढतात. जेन झी असेच वागणार, त्यांना सूचना आवडत नाहीत, ते फार विचार करतात वगैरे. पण या फार फसव्या गोष्टी आहेत. याच वयात मुलांना मार्क्सकेंद्रित शिक्षण न देता आशयकेंद्रित शिक्षणाची जास्त गरज आहे. मग तो कोणत्याही शाखेचा असो. अभ्यासक्रमातील आशय त्याच्या जीवनात किती उतरला हे तपासून त्याची परीक्षा घेऊन गुणदान असायला हवे.



शिक्षकांच्या जबाबदाऱ्याही खूप वाढल्या आहेत. त्यातच जिकडे तिकडे अकॅडम्यांचे तण जोरात वाढलेले दिसून येते. त्यातून गुणआधारित शिक्षणाचा धुमाकूळ आहे. त्यातून आयआयटीत शिकलेले मार्गदर्शन करायला या अकॅडम्यांतून येत असतील तर त्या आयआयटी कॉलेजचा दर्जा काय असेल याचाही विचार आपण केलेला बरा.

या साऱ्यांचा वाईट परिणाम येत्या काळात दिसणार आहे. जुनी सातवी पास असणारी माणसे व्यवहारात मोठमोठे हिशोब आजही तोंडी करतात. पण आजचा गणितात 100 पैकी 100 मिळवलेला विद्यार्थी हिशोबासाठी कॅल्क्युलेटर वापरतो, या फरकाकडे आपण किती दिवस डोळेझाक करणार आहोत?

आपण लहानपणी अभ्यासलेल्या त्या कविता आजही आपल्याला आठवतात. “घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात…” किंवा “गाई पाण्यावर काय म्हणून आल्या…” किंवा “हिरवे पिवळे ऊन सोनेरी पसरे चौफेर…” यासारख्या अनेक कविता स्मरणातून जात नाहीत. का? तर त्या कवितांचा आशय आपण शब्दशः जगलेलो होतो. आता दहावी पास झालेल्या ऐंशी-नव्वद टक्केवाल्याला त्याने अभ्यासलेल्या कवितांविषयी विचारा. हाच तो फरक आताच्या मुलांच्या भवितव्याला खाईत लोटणारा आहे.

त्यामुळे पाल्याचे गुण वाढले पण खरंच गुणवत्ता वाढली का, हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे. नुसते गुण आहेत पण गुणवत्ता नसेल तर अशा मुलांचे नाणे आत्ताच्या जगात वाजणार नाही हे निर्विवाद.

✍️भीष्मा चांदणे, 9881174988, करमाळा जिल्हा सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!