आदिनाथचा लिलाव ही तालुक्यासाठी अतिशय दुर्दैवी घटना : संचालक डॉ.अमोल घाडगे

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा तालुक्यातील सहकाराचे,सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे मंदिर असलेला आदिनाथ कारखाना,ही शासकीय दरानुसार सुमारे ५०० कोटी रुपयांची मालमत्ता कवडीमोलाने लिलावात विकली जावी हे या तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकरी,सभासद,कामगार, कर्मचारी व सामान्य जनतेच्या दृष्टीने अतिशय वेदनादायी,दुर्दैवी घटना असल्याची खंत आदिनाथचे संचालक,मोहिते -पाटील यांचे कट्टर समर्थक व सुप्रसिद्ध कान,नाक,घसा तज्ज्ञ डॉ.अमोल घाडगे यांनी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले,या कारखान्याविषयी सुरुवातीच्या काळात कोणी निस्वार्थीपणे योगदान दिले याची आजच्या पिढीला माहितीच नाहीये.आदिनाथच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली ती सहकार – महर्षींच्या उपस्थितीत आदिनाथ मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत.त्यावेळी त्यांचे निष्ठावंत समर्थक असलेले विनायकबापू घाडगे,गिरधरदास देवी, पन्नालालकाका लुणावत,रावसाहेब पाटील,दिनकरराव लोंढे,गोविंदबापू पाटील,डॉ. पानाचंद गांधी,गुरुदासबप्पा जाधव ही मंडळी उपस्थित होती.त्यावेळी सहकारमहर्षींची मुख्य प्रवर्तक,संस्थापक – चेअरमन म्हणून एकमताने निवड झाली पण नियोजित आदिनाथचे मुख्य प्रवर्तक होण्यासाठी,सभासद होण्यासाठी करमाळा तालुक्यात आवश्यक असलेलीआपल्या तरटगाव येथील जमिनीतील पाच एकर शेतजमीन माझे आजोबा विनायकबापू यांनी सहकारमहर्षींच्या नावे बक्षिसपत्र करून दिली व सहकारमहर्षीनी त्याच वेळी १९७१ साली आदिनाथचे इरादापत्र आणले,त्यानुसार त्यावेळी कारखान्याची साईट ही त्यावेळी खांबेवाडीच्या माळरानावर ठरली होती.
पण पुढील काळात बऱ्याच घडामोडी घडल्या,११ फेब्रुवारी १९७९ रोजी सहकार महर्षींचे अचानक निधन झाल्यानंतर तालुक्यातील मोहिते समर्थकांमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू झाली,परिणामी आदिनाथ साकार व्हायला तब्बल बावीस वर्षे जावी लागली.या गटबाजीमुळे आदिनाथ हा खांबेवाडीऐवजी शेलगाव भाळवणीच्या माळावर उभा राहिला.
कोणामुळे, कशामुळे वगैरे हा इतिहास सर्वश्रुत असल्याने तो पुन्हा उद्धृत करण्याची गरज नाही.चारी बाजूने ऊसपट्ट्यात असलेल्या आदिनाथची सुरुवातीच्या काळात सुरू असलेली जोमदार वाटचाल कोणाकोणाच्या सत्ताकाळात अन् कशी दिवाळखोरीपर्यंत गेली हेही सर्वज्ञात आहे.त्यामुळे तेही आता उगाळत बसणे गरजेचे नाही.
मात्र आज या तालुक्याचे भूषण असलेला आदिनाथ विकला गेला ही दारुण वस्तुस्थिती आहे.त्या काळी सहकारमहर्षींच्या निष्ठेपायी आणि या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी निस्वार्थीपणे योगदान देणारे विनायकबापू घाडगे व अन्य काही कार्यकर्ते पुढच्या काळातील आदिनाथच्या सत्ताकारणातून बाजूला पडत गेले आणि “ज्याच्या हाती ससा तो पारधी” या उक्तीनुसार पुढील काळात जे जे सत्तेवर आले,त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीअभावी म्हणा अथवा अन्य काही हेतूंमुळे म्हणा,आदिनाथ हे सहकाराचे पहिले मंदिर विटाळत राहिले…परिणामी आता हा कारखाना मातीमोलाने विकला गेला.
खरं तर शरद पवारसाहेब,विजयदादा यांनी आजवर आदिनाथसाठी वेळोवेळी भरीव योगदान दिलेले आहे.गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सभासदांनी विश्वासाने अडचणीत असलेल्या आदिनाथचे भले होईल या अपेक्षेने विद्यमान संचालक मंडळाच्या हाती एकहाती सत्ता दिली.पण त्यानंतर पवारसाहेब, विजयदादा यांचेकडे त्या त्या वेळी जाऊन सहकार्याचा हात मागण्यास संचालक मंडळ कमी पडले असं मला वाटतं.वेळ गेलेली असली तरी अजूनही विद्यमान संचालक मंडळाने तातडीने पवारसाहेबांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडल्यास साहेब यातून अजूनही मार्ग काढतील असे मला वाटतं!अशी भावना यावेळी बोलताना संचालक डॉ. अमोल घाडगे यांनी व्यक्त केली आहे.


