न्यायालयाने कब्जा दिलेल्या जमिनीत अतिक्रमण- बांधाच्या खुणा मोडून नांगरट केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.६:न्यायालयाच्या आदेशानुसार मोजणी करून कब्जा दिलेल्या जमिनीत घुसून बांधाच्या खुणा मोडणे, हद्द नष्ट करणे तसेच ट्रॅक्टरने नांगरट करून अतिक्रमण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खांबेवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे.

याप्रकरणी अशोक मारुती वायकुळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार २१ जानेवारी २०२६ रोजी बेलीफ व भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित केल्या होत्या. त्यानंतर संबंधित ठिकाणी सिमेंटचे पोल लावून जमिनीच्या हद्दीच्या खुणा करण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यानंतर राजाराम भगवान वायकुळे, नाथा राजाराम वायकुळे, भागवत व पुष्कर अभिजित सुतार या चौघांनी संगनमत करून त्यांच्या जमिनीत अतिक्रमण केले. तसेच मोजणीच्या हद्दीच्या खुणा नष्ट करून बांधाचे नुकसान केले व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमिनीची नांगरट केलीआहे.
यावेळी फिर्यादी यांची पुतण्याची पत्नी अनुसया गोरख वायकुळे या ठिकाणी उपस्थित होत्या, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी उशिराने करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
