ऊसदर व अतिवृष्टी अनुदानासाठी करमाळ्यात १३ नोव्हेंबरला शेतकऱ्यांची बैठक - Saptahik Sandesh

ऊसदर व अतिवृष्टी अनुदानासाठी करमाळ्यात १३ नोव्हेंबरला शेतकऱ्यांची बैठक

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृह, करमाळा (कोर्टाशेजारी) येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीत प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांप्रमाणे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य ऊसदर मिळावा, या मागणीवर चर्चा होणार आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी कारखान्यांनी कोल्हापूरप्रमाणे ऊसदर द्यावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात येणार आहे.

तसेच सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. शासनाकडून पंचनामे करण्यात आले असून लाभार्थ्यांची नावे अनुदानाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. नुकसानभरपाईची रक्कमही निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा निधी तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

तहसीलदारांना निवेदन देणार

बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार, करमाळा यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या सर्वानुमते पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि अतिवृष्टी नुकसानभरपाई सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार आहे.

करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी तसेच जमिनी खरडून गेलेले शेतकरी यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!