१९९३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; आर्थिकदृष्ट्या दुर्बल मित्रांना मदतीचा निर्णय

दिवाळी भाऊबीजेच्या निमित्ताने केम येथील श्री उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये १९९३ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गेट-टुगेदरचा वर्धापन दिन बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी केम येथील हॉटेल धनश्री येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
साधारणतः ३२ वर्षांनंतर गेल्या वर्षी एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी मैत्रीचा हा अनमोल धागा कायम जपण्याचा संकल्प केला होता. त्याच संकल्पनेतून यावर्षी पुन्हा एकदा सर्व मित्रांनी एकत्र येत गेट-टुगेदरचे आयोजन केले.

या स्नेहमेळाव्याची संकल्पना केम येथील दत्ता काका कुलकर्णी, प्रशांत रायचुरें, संतोष जगताप, मंगेश वासकर, भैरू शिंदे, खंडूशेट वासकर, विनोद तळेकर, विजय काळे, वैशाली बचतकर, गोविंद जगदाळे आदी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात आणली. केमसह भोगेवाडी, मलवडी आदी गावांतील माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले.
या भेटीमध्ये सर्वांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या तीन दशकांतील जीवनप्रवास, विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश, कौटुंबिक सुख-दुःख आणि अनुभव यांची मनमोकळी देवाणघेवाण झाली. आज अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असून, या यशस्वी मित्रांनी एकमेकांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या गेट-टुगेदरचे विशेष आकर्षण म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्व मित्रांनी एकत्रितपणे आर्थिक मदत करण्याचा घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय होय. मैत्री केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी आणि एकमेकांना आधार देण्याच्या भावनेतून जपण्याचा आदर्श या मित्रमंडळींनी निर्माण केला.

सर्वांनी हॉटेल धनश्री येथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास अशाच प्रकारे वर्षातून किमान एकदा तरी सर्वांनी एकत्र भेटण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘वय वाढले, काळ बदलला, प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले; पण शाळेच्या बाकावर जुळलेली मैत्री आजही तितकीच घट्ट आहे’ याचा सुंदर प्रत्यय या स्नेहमेळाव्यातून आला.
मैत्री, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि एकमेकांना मदतीचा हात देण्याचा संदेश देणारा हा स्नेहमेळावा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
