करमाळा तालुका फ्रेंड सर्कलचा सहावा स्नेहमेळावा उत्साहात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान;

करमाळा (प्रतिनिधी) : नोकरी, व्यवसाय आणि विविध क्षेत्रांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या करमाळा शहर व तालुक्यातील मित्रांचा समूह असलेल्या करमाळा तालुका फ्रेंड सर्कलचा सहावा स्नेहमेळावा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने उत्साहात पार पडला. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी देशभक्त नामदेवराव जगताप व्यापारी संकुलाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये इलायची केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले वाशिंबे येथील अभिजीत पाटील, रक्तचंदनाची यशस्वी शेती करणारे घोटी येथील संदीप पाटील, कुस्ती क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावणारे पैलवान रोहित बापू दंगाणे तसेच गेल्या अकरा वर्षांपासून बीएन इंडिया कुरीजच्या माध्यमातून सरकारमान्य लिलाव भिशी यशस्वीपणे चालवून बेरोजगारांना रोजगारासाठी भांडवल उपलब्ध करून देणारे नितीन आढाव पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात ‘करमाळा शहर व तालुक्याचा इतिहास’ या विषयावर ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी करमाळा शहर व तालुक्याचा भौगोलिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहास उलगडून सांगितला. पूर्वी विविध क्षेत्रांत अग्रेसर असलेला करमाळा तालुका सध्या काही बाबतींत मागे पडत असल्याचे नमूद करून हे मागासलेपण दूर करण्यासाठी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यानंतर पुणे येथील टेक महिंद्रा कंपनीचे प्रॅक्टिशनर हेड संतोष रणदिवे यांनी अध्यक्षीय भाषणातून फ्रेंड सर्कलच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. यापुढेही समूहाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचे कार्य निरंतर सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पुणे येथील उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले, सहाय्यक राज्यकर आयुक्त संतोष लोंढे, सहआयुक्त राजेंद्र कुऱ्हाडे, सातारा येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे डॉ. दादासाहेब नवले, पुणे येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे अधीक्षक रणजीत जाधव, बारामती शिक्षण विभागाचे अधीक्षक संतोष फाटके, अकलूज येथील आश्रमशाळेचे अधीक्षक दादासाहेब अनारसे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत चांदणे, जिंती हायस्कूलचे सेवानिवृत्त कर्मचारी सुनील भांडवलकर, उमरडचे सरपंच तथा प्रगतशील बागायतदार प्रमोद बदे, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन खटके, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब झोळ, रामवाडी येथील पांडुरंग वारगड, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक ॲड. राहुल सावंत, प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. सुहास मोरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र वारगड यांनी सूत्रसंचालन केले.
