नळांना तोट्या नाहीत, रस्त्यावर पाणी; ग्रामस्थांकडून पाण्याचा अपव्यय

केम (संजय जाधव): केमसाठी कंदर येथून मुबलक पाणीपुरवठा होत असला, तरी घरगुती नळांना तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
केमची लोकसंख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास आहे. गावाला
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केम गावासाठी नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यात आली असून ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना घरापर्यंत नवीन नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक नागरिकांनी या जोडण्यांवर घरात नळ न बसवता थेट पाइप लावून पाणी भरण्याची व्यवस्था केली आहे. पाणी भरल्यानंतर उर्वरित पाणी रस्त्यावर सोडले जाते. काही ठिकाणी तर याच पाण्याने रस्ते धुण्याचे प्रकारही घडत आहेत.
सध्या दुष्काळी परिस्थिती असून शासनाकडून पाणी वापराबाबत नियमावली आणि पाणी कपातीचे नियोजन केले जात आहे. मात्र, केममध्ये या नियमांकडे ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील पाण्याचा अशा प्रकारे अपव्यय होत असताना दुसरीकडे वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बाहेरगावाहून केममध्ये येणाऱ्या नागरिकांनाही रस्त्यावर वाहणारे पाणी पाहून आश्चर्य व्यक्त करावे लागत आहे.
पाणी ही सार्वजनिक संपत्ती असून त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने नळांना तोट्या बसविण्याबाबत नागरिकांना सूचना देऊन पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
याबाबत ग्रामविकास अधिकारी वैभव तळेकर यांच्याशी विचारणा केली असता, नागरिकांनी आपल्या नळांना तोट्या किंवा टोपण बसविले नाही, तर पुन्हा चार दिवसांनी पाणी सोडण्यात येईल. सध्या वाया जाणाऱ्या पाण्यात एखादी वस्ती भागू शकते, असे त्यांनी सांगितले.


