मांगी, झरे, म्हसेवाडी तलावांना पाण्याचे आवर्तन सोडावे; दिग्विजय बागल यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

करमाळा (प्रतिनिधी) : यंदा अत्यल्प पावसामुळे करमाळा तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, कुकडी कालव्याद्वारे मांगी तलावात तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून झरे व म्हसेवाडी तलावात पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत माहिती देताना बागल म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने ऑक्टोबर महिन्यापासूनच तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेतून झरे व म्हसेवाडी तलावात प्राधान्याने पाणी सोडणे आवश्यक आहे.



तसेच कुकडी कालव्याद्वारे मांगी तलावात पाणी सोडल्यास मांगी तलावावर अवलंबून असलेल्या बोरगावसह बारा गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. याशिवाय करमाळा, कर्जत व जामखेड या लगतच्या तालुक्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी मांगी तलाव हा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा टँकर भरणा केंद्र आहे. मांगी तलावाचा पिण्याच्या पाण्यासाठीच्या विशेष आवर्तनात समावेश असल्याने येथे कुकडी कालव्याचे पाणी सोडल्यास परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर करमाळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या सुधारणेसाठी विशेष निधी म्हणून ४० लाख रुपये मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, सोलापूर यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले असल्याची माहिती बागल यांनी दिली. या तिन्ही मागण्यांबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचेही दिग्विजय बागल यांनी सांगितले.

error: Content is protected !!