सरपडोह येथे स्नेहमेळाव्यात यशस्वी युवक-युवतींचा सन्मान

करमाळा (प्रतिनिधी) : सरपडोह येथे भाऊबीजेच्या निमित्ताने माऊली वेलनेस परिवार व सर्पनाथ सेवा मंडळ ग्रुप यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या युवक-युवतींचा सन्मान करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमात पोलीस सहाय्यक निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल रविंद्र शहाजी ढावरे, बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिस असिस्टंटपदी निवड झाल्याबद्दल कीर्ती गणपत घोगरे, मुंबई महानगरपालिकेत अकाउंटंट क्लार्कपदी निवड झाल्याबद्दल सायली लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल प्रदीप प्रभाकर भंडारे व रविंद्र सोमनाथ खरात यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र हँडबॉल संघात निवड झाल्याबद्दल कार्तिक विकास भंडारे, सरपडोह जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक शिवाजी आजिनाथ लोकरे यांना आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सायली आजिनाथ तोरमल हिने एमबीबीएसनंतर एमडी पदवीचे शिक्षण सुरू केल्याबद्दल तिचाही गौरव करण्यात आला.
यानंतर जागतिक आरोग्य सल्लागार मनीषा काळे व महेश काळे यांनी ग्रामस्थांना संतुलित आहार, आरोग्यविषयक काळजी आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाथाराव रणदिवे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश घोगरे यांनी केले, तर युवकांना मार्गदर्शन करून मान्यवरांचे आभार शिवाजी खराडे यांनी मानले. या स्नेहमेळाव्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


