वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी साधनाताई अडसूळ सोशल फाउंडेशनकडून पाण्याची सोय

करमाळा : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या सिंचनापर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची पाळीव जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना मोठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत वनक्षेत्रातील वन्यप्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत सौ. साधनाताई सुनील अडसूळ सोशल फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून करमाळा-कर्जत रोडवरील भोसे वनविभाग परिसरात पशुपक्षी व वन्यजीवांसाठी तब्बल १० हजार लिटर स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात वन्यजीवांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. अनेकदा पाण्याच्या शोधात त्यांचा जीवही धोक्यात येतो. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. या पाणवठ्यामुळे परिसरातील पशुपक्षी आणि वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती कमी होण्यास मदत होणार आहे.

माणसांप्रमाणेच पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही जगण्याचा अधिकार असून, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही आपली सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारी आहे, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून आणि समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

