शिखर शिंगणापूर-कपिलधार दिंडीचे केममध्ये उत्साहात स्वागत; उत्तरेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण - Saptahik Sandesh

शिखर शिंगणापूर-कपिलधार दिंडीचे केममध्ये उत्साहात स्वागत; उत्तरेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरण

केम (संजय जाधव): शिखर शिंगणापूर ते कपिलधार या दिंडीचे १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता केम येथे आगमन झाले. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दिंडीतील पालखीचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले.

केम येथील जिल्हा परिषद शाळेजवळ दिंडीचे आगमन झाल्यानंतर पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या श्री उत्तरेश्वर मंदिरात पोहोचली. यावेळी राष्ट्रसंत श्रीपाद पद्मभास्कर डॉ. निळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज आणि श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांचा श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महंत जयंतगिरी महाराज व डॉ. निळकंठ शिवाचार्य महास्वामी



यानंतर डॉ. निळकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांचे आशीर्वादपर प्रवचन झाले. त्यांनी आपल्या प्रवचनातून गुरूंचे महत्त्व विशद केले. प्रत्येकाच्या हृदयात गुरूचे स्थान असले पाहिजे. सध्याच्या काळात गुरूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असून, गुरूंचे महत्त्व आणि अस्तित्व समाजाला समजावे, या उद्देशाने दिंडीचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



महंत जयंतगिरी महाराज यांनीही आपल्या भाषणातून गुरूशिवाय जीवन व्यर्थ असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट करणारी उदाहरणे दिली.

यानंतर उपस्थित शिवभक्तांनी सामूहिक शिवपाठ म्हटला. यामुळे संपूर्ण उत्तरेश्वर मंदिर परिसर शिवमय आणि भक्तिमय झाला होता. त्यानंतर शंकराची आरती करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटपाने झाली.या दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी वीरशैव लिंगायत समाजाच्या बांधवांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!