‘उजनी’च्या पाण्यावर असलेला “डिकसळ पुलाचा काही भाग कोसळला – पुलावरील वाहतूक केली बंद..!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.१४) : कोंढारचिंचोली (ता.करमाळा) पासून डिकसळ या दरम्यान ‘उजनी’च्या पाण्यावर असलेला सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्याला जोडणारा “डिकसळ पुल” हा वाहतूकीसाठी अत्यंत धोकादायक झाला आहे, या पुलाच्या मध्यभागातील खालील भाग खालून पडला असून, यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेतला असून वाहतूक सध्या बंद केली आहे.
करमाळा तालुक्यातील अनेक प्रवासी पुणे जिल्ह्यात जाण्यासाठी या डिकसळ पुलावरून मधल्या मार्गे जात असत, हा पुल इंग्रज काळात बांधण्यात आलेला आहे, त्यामुळे या पुलाला जवळपास १६० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत, अनेकवेळा हा पुल धोकादायक झाला असून याचा वापर बंद करावा म्हणून प्रशासनाने यावर बॅरोगेट लावले होते, परंतु याचा वापर सुरुच होता, त्यानंतर आज एका व्हिडिओच्या माध्यमातून या पुलाच्या मध्यभागातील काही भाग खालून कोसळलेला आहे, असे दिसत असल्याने या पुलाची वाहतूक बंद केली असून, या मार्गावरुन पुणे व मुंबईला जाण्यासाठी त्या भागातून येणाऱ्या प्रवाशांनी राशिन मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पुलाची पहाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के. एम.उबाळे यांनी दिली आहे.
डिकसळ पुलाला 55 कोटी रु निधी मंजूर… कोंढारचिंचोली (ता.करमाळा) ते डिकसळ (जि.पुणे) या दरम्यानच्या उजनीच्या पाण्यावर उभा असलेल्या या पुलाला सण २०२१-२२ च्या अर्थ संकल्पात 55 कोटी रु निधी मंजूर झालेला आहे.
डिकसळ पुलाचे महत्त्व – करमाळा विधानसभा मतदारसंघातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रमुख जिल्हा मार्ग 190 असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका यांना जोडणारा डिकसळ पुल आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे, या पुलाचे काम झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी , रुग्ण यांना रहदारीचे दृष्टीने सोयीचे होईल. सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हा यांना दळणवळणाच्या दृष्टीने डिकसळ पुल हा अत्यंत महत्त्वाचा आहे.