दारूमुळे तरुणांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर!

विनोद चाळीस वर्षाचा तरुण अंथरुणावर झोपून होता. बायका मुलं डोळ्यात प्राण आणून त्याच्या भोवती बसून होती. प्राथमिक शिक्षण घेत असलेली दोन गोंडस मुलं भेदरलेल्या नजरेने बापाच्या खोल गेलेल्या डोळ्यात पहात होती. कमी शिक्षण झालेली परंतु संसाराला साजेशी नीटनेटकी असणारी पत्नी सुरेखा पुर्णपणे हरलेल्या नजरेने पतीच्या पायापाशी बसून आता काय होणार या भीतीने हादरून गेली होती. स्वतःच्या जीवापेक्षा विनोद वर जास्त प्रेम करणारी आई विनोदच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत विनोदचा लहानपणी पासूनचा जीवन प्रवास डबडबल्या डोळ्यांनी आठवून पदराने अश्रू पुसत होती.

विनोद लहानपणापासून तसा आज्ञाधारक सर्वांना समजून घेणारा असा मुलगा होता पत्नीही त्याला साजेशी मिळाली होती. कष्ट करून कुटुंब आनंदाने राहत होते. त्यांचा छोटासा संसार सुखा समाधानात चालू होता. खाऊन पिऊन कुटुंब सुखी होते; परंतु नियतीला ही सुख मान्य होत नाही असं म्हणतात अशी परिस्थिती निर्माण झाली. आपला कामधंदा करून कुटुंबाला आनंदाने सांभाळणा-या विनोदचे मित्र सुध्दा चांगले होते. परंतु नियतीचा फेरा आला आणि दोन नवीन मित्र त्याला मिळाले जे अगोदर पासूनच दारूच्या आहारी गेलेले होते. इथूनच विनोदच्या जीवनाची वाताहात व्हायला सुरुवात झाली.
नवीन मित्रांनी विनोदला हेरले आणि आपल्या जाळ्यात ओढले सुरुवातीला नकार देत असताना विनोदला स्वतःच्या पैशाने दारू पाजून मुठीत घेतले विनोद व्यसनी मित्राच्या संगतीला लागला. कधीमधी मित्रांच्या संगतीने दारू पिऊ लागला कामावर आधीमधी दांडी मारू लागला. पत्नी सुरेखाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तिने त्याला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तेवढ्यापुरते आणाभाका घेऊन आणि वर वरचे बोलून विनोदने पत्नी सुरेखाचा विषय मागे टाकला. सुरेखा व आईला खोटे बोलून दारूचे व्यसन रोज करु लागला. परिणाम असा झाला काही दिवसातच त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला डॉक्टरांना दाखवले असता डॉक्टरांनी औषधोपचार करून दारूचे व्यसन सोडण्याचा सल्ला दिला काही दिवस थोडं बर वाटत आहे असं वाटताच तो पुन्हा चोरून दारू पिऊ लागला. मित्र संगतीला होतेच परत काही दिवसांनी त्याला असह्य त्रास होऊ लागला पुन्हा दवाखान्यात दाखल केले डॉक्टरांनी बाहेरच्या दवाखान्यात नेहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बाहेरच्या दवाखान्यात दाखवले असता विनोदचा लिव्हर खराब झाला असून त्यावर उपचार करणे आवाक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दारुमुळे परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.

आई पत्नी हतबल झाली मुलं लहान होती त्यांना तर त्यातला काहीही गंध नव्हता विनोद भरल्या डोळ्यांनी मुलांकडे पाहून मनामध्ये पश्चाताप करत होता माझ्या बायका मुलांचे काय होणार याचा सातत्याने विचार करत होता पण वेळ हातातून गेली होती. ही सर्व परिस्थिती फक्त दारुमुळे निर्माण झाली होती. कुठलाही कामधंदा नसल्यामुळे संसाराची घडी विस्कटली गेली होती. मुलांच्या चेहऱ्यावरची टवटवी नष्ट झाली होती पत्नी व आई खंगून गेली होती त्याही परिस्थितीत स्वतःला सावरत दोघी मुलांना सांभाळत होत्या आणि एक दिवस असा आला की विनोदचा त्रास त्याच्या अंताला कारणीभूत ठरला विनोद गेला हे पाहून आई पत्नी सुरेखा व मुलांनी टाहो फोडला शेजारपाजारी नातेवाईक जमा झाले. विनोदचे क्रियाकर्म पूर्ण केले. दुःखद प्रसंगी आलेले जवळील नातेवाईक दहा दिवस सांत्वन करून निघून गेले. विनोदचे सर्व कुटुंब क्षणार्धात अनाथ झाले कर्ता पुरुष गेल्यामुळे संसार उध्वस्त झाला.

तरुणपणात बायका मुलांचे हाल हाल होऊ लागले बायका मुलांना वाटले की कोणत्या जन्मात पाप केले म्हणून हे आता फेडायचे आले आहे. असे नशिबाला दोष देत जीवन कंठत आहेत ही एका गावात घडलेली सत्य घटना आहे. विनोद सारख्या अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अशी परिस्थिती सध्या प्रत्येक गावामध्ये दिसून येत आहे. तरुणपणात मृत्यू पावलेले बरेचसे तरूण दारूमुळे अपघातात व आजारामध्ये जीवनाला मुकले आहेत याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज निर्माण झाली आहे व्यसनमुक्त गाव व समाज निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची तसेच संत विचारांची आवश्यकता आहे असे वाटते.
● लेखन – भाऊसाहेब फुलारी श्री देवीचामाळ करमाळा






