पोलीस उपनिरीक्षक बबनराव साळुंखे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ... - Saptahik Sandesh

पोलीस उपनिरीक्षक बबनराव साळुंखे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त …

करमाळा तालुक्यातील सौंदे  येथील पोलीस उपनिरीक्षक श्री बबन श्रीपती शिंदे हे पोलीस खात्यातील प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 जानेवारी 2025 ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कारकिर्दीविषयी परिचय करून देणारा लेख प्रा. धनंजय पन्हाळकर यांनी लिहिला आहे.

वयाच्या १० व्या वर्षी वडीलांचे छत्र हरपले. कोरडवाहू  शेती  प्रतिकूल परिस्थितीत मोठे भाऊ व आई यांनी मोलमजुरी करून शिकवले. बबन साळुंखे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सौंदे व साडे या ठिकाणी झाले. महाविद्यालय शिक्षणासाठी बार्शी येथे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला व 1989 साली बी.एससी वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. पुढे उच्च शिक्षण घेण्याऐवजी त्यांनी  कुटुंबासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यास महत्त्व दिले.नोव्हेंबर 1990 मध्ये सोलापूर पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी भरती निघाली होती कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नोकरी मिळावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले, तेव्हा प्रथमच धावणे व शारीरिक चाचण्यांचा संबंध आला. वजन ४९ किलो होते. छाती जेमतेम आवश्यक तेवढीच होती. शरीर यष्टी काटक असल्यामुळे चाचण्या पार केल्या. लेखी परिक्षा चांगले गुणांनी उत्तीर्ण १९९१ मध्ये नागपूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण आदर्श प्रशिक्षणार्थी म्हणून ओळख निर्माण केली.

पोलीस मुख्यालय सोलापूर येथे 1991 साली  त्यांची प्रथम नियुक्ती झाली. 1994 ला ते टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे बदली होऊन आले. 2002 नंतर त्यांना बढती मिळाली व कुर्डूवाडी पोलीस स्टेशनला बदली झाली. 2008 ते 2014 त्यांनी हवलदार या पदावर अकलूज येथे सेवा केली. खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले होते परंतु पोस्टिंग मेरिट नुसार द्यायची की सेवानिष्ठतेनुसार यात वाद निर्माण झाला व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दिल्ली  येथे गेल्यानंतर मेरिटनुसार पदोन्नती न देता  ती सेवा जेष्ठतेप्रमाणे देण्यात यावी असा निकाल  लागला त्यामुळे त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 2018 पर्यंत थांबावे लागले. त्यांच्या सेवेतील बराच काळ अकलूज येथेच गेला निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांची बारामती येथे पेन्सिल चौकामध्ये बदली झाली.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात तपास प्रक्रियेतील उत्कृष्ट कार्य शैेलीमुळे नावाजलेले दप्तरी रायटर म्हणून व एक वेगळं आदर्श व्यक्तिमत्व म्हणुन ओळख निर्माण झाली.
टेंभुर्णी येथे कार्यरत असताना   पोलीस ठाणेची नुतन इमारत लोक वर्गणीतून उभा राहिली त्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते तत्कालीन पोलीस अधीक्षक मा.संजय कुमार सिंगल साहेब यांनी त्याबद्दल गौरव केला.सेवेमधे असताना खुन,दरोडे, बलात्कार,चोरी,जबरी चोरी,ठकवणूक अफरातफरी संघटीत गुन्हेगारी(मोका) व इतर गुंतागुंतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे  तपासात  उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रावरुन कित्येक अपराद्यांना शिक्षा झालेली आहे. त्यासाठी  केलेल्या उत्कृष्ठ कामांसाठी पोलीस सेवेत १३० बक्षीसे मिळाली आहेत. तसेच मा.विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे वर्मा साहेब ,व मा. विश्वास नांगरे पाटील साहेब  यांनी  उत्कृष्ठ कामगिरी बद्दल बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन  गौरविले आहे.

बारामती येथे ही अल्प अवधीत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अनुभवातून  इतर पोलीस अधिकारी  व  पोलीस ठाणे अंमलदार,बिट अंमलदार यांना  नेहमी योग्य मार्गदर्शन करून मदत करण्याची सवय आहे.  रायटर असताना नेहमी तपासाचे कागदपत्र  तयार करणेत एकाग्र  व व्यस्त असायचे  म्हणून त्यांना सोलापूर  ग्रामीण  पोलीस दलात मधे त्यांचे सहकारी “कागदांचे दादा “असे संबोधत असे. त्यांना अवगत असलेले ज्ञान इतर सहकारी अंमलदार यांना देऊन त्यांनी बरेच दप्तरी (रायटर) तयार केलेले आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू, नेहमी सहकार्य करणेची भावना, योग्य  मार्गदर्शन यामुळे त्यांची पोलीस खात्यात व  जनमानसात प्रतिमा आदर्श असून पोलीस स्टेशनचे प्रत्येक कामात सक्रिय भाग घेऊन व्यावसायिक दृष्टीने व सकारात्मक पद्धतीने कर्तव्य बजावत नागरीकांचे तक्रारीचे निरसन करण्याचा त्यांचा  हातखंडा होता.  माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायद्याविषयीची जागरूकता व विद्यार्थीदशेत शिस्तीचे असणारे महत्व तसेच सामाजिक विकास आणि परिवर्तनामध्ये तरुणाची भूमिका, व्यवहारात परिवर्तनाची गरज,भावनेवरील नियंत्रण ,वाढती व्यसनाधिनता,सोशल मीडिया व मोबाईल वापराचा अतिरेक या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पोलीस भरती मार्गदर्शन करुन मदतीच्या हात देत आलो आहे.

कोणत्याही क्षेत्रात काम करा ते काम प्रामाणिकपणे केल्यास निश्चित समाधान व आनंद मिळेल असे तत्व असल्याने त्यानुसार पोलीस दलात ३४ वर्ष सेवा कर्तव्यदक्ष, व्यवसायिक व  प्रामाणिकपणे पोलीस खात्याशी एकनिष्ठ राहून जनतेशी दांडगा जनसंपर्क  ठेऊन चोख व निष्कलंकपणे बजावली आहे.

अतिशय  मनमिळाऊ, सामाजिक बांधिलकी जपणारे,  सर्वच क्षेत्रातील माहिती असणारे, प्रचंड आत्मविश्वास असणारे  लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आपलं वाटणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.  आपल्या अस्तित्वामुळे दुसऱ्याला दुःख होणारे नाही याची काळजी घेणारे,स्वतःपेक्षा सहकाऱ्यांचे मन जपणारे , कुटुंब आणि मित्रपरिवाराला सोबत घेऊन मार्गक्रमण करणारे,अफाट मित्रपरिवार जीवाला जीव देणारी माणसं.  इतकं सगळं असतानाही जमिनीवर राहणारे,  प्रत्येक सहकाऱ्यांच्या  चांगल्या वाईट प्रसंगात पाय रोवून उभे राहणारे माननीय बबनराव साळुंखे साहेब तुमच्याबद्दल एवढेच म्हणावं वाटतं
शाश्वत रव तुमच्या
मधुर स्वरांचा!
चिरतरुण काया तुमची
जसा गंध फुलांचा !
प्रसन्न चेहरा तुमचा
जसा चंद्र पौर्णिमेचा!
बबनराव साळुंखे यांना वृक्षारोपणाचा व  बागकाम यांचा छंद असल्यामुळे त्यांनी आपल्या घराच्या भोवती सुंदर अशी बगीचा तयार केलेली आहे त्यामध्ये अनेक फुलपाखरे पक्षी वास्तव्य करतात रोज सकाळी सकाळी त्यांच्या बागेमध्ये फुले उमलेले असतात. बबनराव साळुंखे साहेब हे आमचे बीएससी पर्यंतचे वर्गमित्र अतिशय साधं राहणीमान परंतु अनेक लोकांशी मैत्रीचे संबंध आजतागायत त्यांनी टिकून ठेवले आहेत सामाजिक बांधिलकी म्हणून हुंडाबळीच्या केसेस त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हाताळून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याऐवजी उभा केले आहेत.

सुलेखन-प्रशांत खोलासे, केडगाव ता.करमाळा (मो. 9881145383)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा त्यांनी अनेकांना सल्ला दिला आहे. साळुंखे साहेबांचं कुटुंब अतिशय छोटे आहे त्यांना एक उच्चशिक्षित डॉक्टर कन्या असून तिचा मागील वर्षीच विवाह झाला आहे. पत्नी, मुलगी आणि ते स्वतः असा त्यांच्या घरातील छोटा परिवार असला तरी इतर नातेवाईकांशी अतिशय सलोख्याचे संबंध राखून ठेवले आहेत.  पोलीसी खाक्या असताना देखील त्यांना लिखाणाची खूप आवड आहे त्यांच्या अनेक कविता ,कथा वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्या आहेत . भविष्यामध्ये निवृत्तीनंतर त्यांनी पुस्तक लेखनाचा संकल्प केला आहे. “पोलीस तपासातील तंत्र” आणि “पोलिसांच्या व्यथा “अशी दोन पुस्तके लिहिण्याचा त्यांचा मानस आहे त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!
         

कल्पवृक्ष हा नेहमी
तुमच्या दारी असो !
त्या वृक्षाच्या छायेखाली
जीवन तुमचे सुखी असो!

सेवानिवृत्ती म्हणजे पूर्णविराम नसून तो स्वल्पविराम आहे तेव्हा पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चांगले आरोग्य लाभो व सुखसमृद्धीने आनंदी जीवन जगण्यासाठी शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

प्रा. धनंजय विठ्ठल पन्हाळकर, ९४२३३०३७६८
नेरले, ता. करमाळा
जिल्हा सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!