आ.नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांकडे मांडल्या मतदार संघातील आरोग्यविषयक समस्या - Saptahik Sandesh

आ.नारायण पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांकडे मांडल्या मतदार संघातील आरोग्यविषयक समस्या

करमाळा(दि.३१) : करमाळा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन मतदार संघातील आरोग्यविषयक समस्या मांडल्या.

जेऊर येथे सर्व सुविधांयुक्त ट्रामा केअर सेंटर उभा करावे, मतदार संघातील प्राथमिक, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत आदी प्रकारच्या आरोग्यविषयक मागण्या त्यांनी केल्या.

याविषयी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले कि अहिल्यानगर (अहमदनगर)-पंढरपूर हा रस्ता करमाळा मतदार संघातून जातं असून प्रवाशी तसेच प्रत्यक्षात करमाळा मतदार संघातील नागरिक यांच्या आरोग्य सुविधा व उपचारासाठी सध्या परिपूर्ण अशी व्यवस्था उपलब्ध नाही. या विदर्भ, खान्देश यांना दक्षिण भारतास जोडताना आमच्या करमाळा मतदार संघातून रस्ता जातो. मोठ्या प्रमाणावर पर्यटक तसेच मालवाहतूक वाहनाची वर्दळ या भागातून होते. त्यानुसार अनेकदा अपघातही घडतात. यामुळे प्रवाशी तसेच नागरिक यांचेवर वेळीच उपचार करण्यासाठी जेऊर ता करमाळा येथे ट्रामा केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तसेच या संदर्भात निवेदनही दिले. 

यावर आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निवेदनावर शेरा मारला. यात मंत्रिमहोदय यांनी आरोग्य राज्य सचिव यांना प्रत्यक्षात माहिती घेऊन व तपासून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य विभागातील करमाळा मतदार संघातील रिक्त पदे भरण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!