‘माळीण’ भेटीचा अनुभव
माळीण दुर्घटनेला आज दि.३० जुलै रोजी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लिहिलेला लेख
मागच्या महिन्यात मित्रांसोबत भीमाशंकर भागात फिरायला गेलो असता दत्ता धादवड नावाच्या मित्राच्या घरी गेलो. तो कुशिरे बुद्रुक या गावी राहतो जे भीमाशंकर पासून सुमारे १५ किलोमीटरवर आहे. तेव्हा तिथे समजले की माळीण गाव जवळच दहा किलोमीटरवर आहे म्हणून तिथे भेट देण्याचा विचार आम्ही मित्रांनी केला.
दि. 30 जुलै 2014 रोजी सकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराची कडा कोसळली. मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. अचानक घडलेल्या या घटनेने कोणालाही सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगार्याखाली गाडले गेले आणि या दुर्घटनेत 151+ लोक मृत्युमुखी पडले. निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला आज 30 जुलै रोजी 10 वर्षे पूर्ण होतील.
या दुर्घटनेत 44 कुटुंबांतील 151 लोक दगावले. 9 जण वाचले तर 39 लोक बाहेरगावी असल्याने बचावले. प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरते पत्र्याचे निवारा शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली.
आम्ही माळीन गावाजवळ गेल्यानंतर तिथे एक बोर्ड लावलेला होता. उजव्या बाजूला जुने माळीण गाव होते तर डावी कडे नवीन माळीण गाव. जुन्या माळीण गावात गेल्यानंतर तिथे शासनाने तयार केलेलं स्मृतीवन पाहायला मिळाले ज्यामध्ये एक स्मृतीस्तंभ उभारला होता. या स्मृती स्तंभावर माळीण दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या लोकांची नावे लिहिली आहेत. तसेच तिथेच एक स्मृती वन तयार केले आहे ज्यामध्ये प्रत्येकाच्या नावाची स्मृती म्हणून एक रोप लावण्यात आलेले होते. याचबरोबर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या १५१ व्यक्तींचे नाव असलेला एक स्मृती स्तंभ तिथे उभारले आहे. आता फक्त तिथे एक जुनी शाळा पाहायला मिळाली जी दरड कोसळल्याच्या बाजूला असल्यामुळे नीट राहिली.
आमच्या मित्राने सांगितले की माळीन दुर्घटना झाली त्यामध्ये त्याच्या मावशीचा परिवार देखील होता. दुर्घटना झालेली बातमी कळताच तो पुण्याहून माळीणला गेला. त्याने सांगितले की, बचाव करण्याचे ऑपरेशन ३-४ दिवस चालू होते. यात फक्त ९ लोक जिवंत सापडू शकले. बाकी अनेक लोक ढिगाऱ्याखाली कुठे ना कुठे कदाचित जिवंत मिळाले असते. NDRF पथक, ३ जेसीबी ढिगारा हटवून लोकांनां बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु सततच्या पावसामुळे व मातीच्या प्रचंड ढिगाऱ्यामुळे त्यांना जास्त काम करता आले नाही. जिथे जिथे जेसीबी माती उकरण्याचा प्रयत्न करत होता तिथे तिथे गाडल्या गेलेल्या लोकांचे कुणाचे हात, कुणाचे पाय, इतर अवयव तुटून जेसीबीच्या हाताला लागत होते. त्यामुळे जेवढे मृत व्यक्ती मिळाले त्यांच्यावर लगेच अंत्यसंस्कार करण्यात आले व बाकी लोकांचे मृतदेह बाहेर काढता आले नाहीत.
जुन्या माळीण गावाची पाहणी केल्यानंतर आम्ही नवीन स्थलांतरित केलेल्या माळीन या गावी गेलो. तिथे या आमच्या मित्राची एक मावस बहीण राहते. दुर्घटनेवेळी ती दुसरीकडे शिकायला होती त्यामुळे ती त्यावेळी वाचली होती. सध्या ती शासनाने बांधून दिलेल्या घरात राहत आहे. तिथे गेल्यानंतर त्यावेळी नवीन वसलेले गाव पाहिले. तिथे शासनाने नियोजन करून गाव वसवले आहे. लोकांना सिमेंटची पक्की घरे, सिमेंटचा रस्ता, शाळा, समाजमंदिर, पाण्याची टाकी, पाणीपुरवठाचे नळ, आरोग्य केंद्र, गाई गुरांना बांधण्यासाठी जागा, बस स्टॉप, ग्रामपंचायत कार्यालय आदी गोष्टी तयार बांधून दिल्या आहेत. त्याचबरोबर वाचलेल्या लोकांना संसारउपयोगी वस्तू, मृतव्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत राज्य सरकारकडून दिली गेली.
सदर दुर्घटनेला एकाच वेळी फार मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस हे जरी निसर्गनिर्मित कारण असले तरी मानवनिर्मित कारण असल्याचेही काही भूस्खलन तज्ज्ञांनी सांगितले आहे. ज्यात शेतीसाठी डोंगरावरील जमिनीचे सपाटीकरण करणे, त्यासाठी केलेली जंगलतोड ई. असू शकतात. अशाच प्रकारची दुर्घटना गेल्या वर्षी (जुलै 2023) रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेली आहे, ज्यात सुमारे 100 पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.