शहीद-ए-आझम
भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे करोडो भारतीयांचे,युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे शहीद भगतसिंग.वसाहतवादी ब्रिटिश सत्तेचा नायनाट करण्याची क्रांतीकारी भावनेची ज्वाला लहानपणापासूनच त्यांच्या बंडरुपी हृदयात धगधगत होती.१९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांडाने ब्रिटिशांविरुद्धचा तो विद्रोह आणखीच मजबूत झाला होता. कॉलेज जीवनात असतानाच त्यांचा क्रांतीकारकांशी संबंध आला. त्यावेळी त्यांनी हिंदूस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली होती नौजवान भारत सभेची स्थापना केली होती,यातूनच त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कृतीची जोड मिळत गेली, राजगुरू, सुखदेव,बटुकेश्वर दत्त यांसारखे धाडसी युवक मित्र त्यांना लाभले,ऐन तारुण्यात त्यांनी ब्रिटिश पार्लमेंट मधे बॉम्ब फेकुन ईथल्या भैऱ्या झालेल्या जुलमी फिरंगी व्यवस्थेला हादरा दिला होता, भगतसिंग यांच्या विद्रोहाला विधायक विचारांची दूरदृष्टी होती, समाजवादी धर्मनिरपेक्ष जातीभेद मुक्त भारत निर्माण व्हावा हे त्यांचे स्वप्न होते, भगतसिंगांचे हे विद्रोहाचे,क्रांतीचे, तत्वज्ञान हे उद्याच्या सुंदर भारताचे स्वप्न होते.
भगतसिंगांनी आपल्या २३ वर्षे पाच महिने २३ दिवसांच्या इवल्याशा आयुष्यात वैचारिक तत्वज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणावर वाचन केले व लिखाणही केले.नास्तिक विचारसरणीचा हा युवक इथल्या धर्मांध व्यवस्थेला ईश्वराचे अस्तित्व नाकारुन प्रश्नही विचारत होता मी नास्तिक का आहे यामधे भगतसिंग लिहितात कि इथल्या ब्रिटिशांच्या मस्तकात हा इश्वर देश सोडून जाण्याची सद्बुद्धी का देत नाही ? झोपडीत राहणाऱ्या भूकेने व्याकूळ होणाऱ्या गरीबी, उपासमार,जातीयता या आपल्या बांधवांच्या वाट्याला का आणली ? ईश्वराला हे थांबवता येत नाही का ? ईश्वरावर श्रध्दा व त्याची उपासना, प्रार्थना करणे हे मनुष्यासाठी मी सर्वात नीच आणि स्वार्थी काम समजतो असं ते म्हणतात. ज्या देशातले युवक समकालीन राजकारण असमानतेवर आधारित सामाजिक व्यवस्था, अर्थकारण,शिक्षण, पर्यावरण, विज्ञान,या विषयी चिंतन करत नाहीत त्यात बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असत नाहीत, गाफील राहून गुलामी सहन करतात तो देश अज्ञान, अंधश्रद्धा, गुन्हेगारी,शोषण, पारतंत्र्य वैचारिक गुलामगिरी या आणि अशा अनेक प्रकारच्या अंधारात खितपत असतो. भगतसिंगांना सजग, जागृत, अभ्यासू, चिंतनशील,निर्भय, धर्मनिरपेक्ष अशा कृतीशील राष्ट्रप्रेमी युवकांची अपेक्षा होती,मी नास्तिक का आहे या लेखात भगतसिंग लिहितात, मित्रांनो काही विशेष लोकांनी त्यांची श्रीमंती, वर्चस्व, आणि सत्ता टिकवण्यासाठी हे अधर्मांध लुटारु तत्वज्ञान तयार केलं आहे आधी माणसाला श्रध्दाळू बनवायचं आणि आयुष्यभर त्याला लुटत राहायच.धर्माचे प्रसारक आणि सत्ताधारी यांच्यातील युतीतूनच जगात तुरुंग,फाशीच तख्त,गळा आवळ्यासाठी वापरलं जाणारं दोरखंड आणि हे तत्वज्ञान बनवलं.
भगतसिंगांचे हे विचार खरोखरच तर्कशील होते, व त्याला ज्ञानाची,चिंतनाची जोड होती. भगतसिंगांची लढाई ब्रिटिशांविरुद्ध होती हे खरं आहे परंतु त्यांची एक लढाई याच आघाडीवर भारतीय पराभूत मानसिकता, अंधश्रद्धा, अज्ञान, जातीभेद, वर्णवर्चस्ववाद यांच्या विरोधातही होती, हे देखील आज प्रत्येक भारतीयाने समजून घेतले पाहिजे.भगतसिंगांनी नास्तिकतेचे समर्थन करणे म्हणजे हे त्यांच्या विद्रोही विचारांचे द्योतक होते,माणसाचे अश्रू पुसणारे सेवाभावी हात धर्मनिरपेक्ष,निस्वार्थ, आणि नास्तिक हवेत अशी अपेक्षा भगतसिंग करतात,ते धर्माची बौध्दिक गुलामगिरी नाकारतात धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असाव्यात धर्मसत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवण्याची गरज नाही आज तेच घडत आहे आपण तेच पाहत आहोत,केवढी दूरदृष्टी होती त्यांची, भगतसिंगांच्या संपूर्ण चिंतनाचा माणूस हाच केंद्रबिंदू होता मानवतावाद सामाजिक समता,हे भगतसिंगांच्या विद्रोही विचारांच्या केंद्रस्थानी होते.
भगतसिंगांचे विचार आणि कार्य याविषयी आज उलटसुलट लिहिलं जातं कारण भगतसिंगांचे ,समतेचे,क्रांतीचे, विचार इथल्या धर्मांध सत्तेच्या पचनी पडत नाहीत.ते सतत या व्यवस्थेला हादरा देत राहतात, त्यामुळे आपण भारतीय म्हणून एकसंध राहून त्यांचे विचार आत्मसात करून हा देश सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या परिवर्तनशील होऊन वैभवसंपन्न व्हावा यासाठीच तत्पर असले पाहिजे, अशा या थोर क्रांतिकारक स्वातंत्र्ययोध्याला कोटी कोटी वंदन जय भारत जय संविधान
✍️ समाधान दणाने, करमाळा, जिल्हा-सोलापूर