खासगी क्लासवाल्याची पालकांनी केली धुलाई – चुकीचा आरोप असल्याचा शिक्षकाचा खुलासा…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील वेताळपेठेतील गणित विषयाच्या खाजगी क्लास चालकाने मुलीच्या छेड काढल्याच्या घटनेने करमाळा शहरातील युवक व नागरीकांनी संबंधित क्लास चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीनेही युवकांनी करमाळा पोलीसात या क्लास चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेने करमाळा शहरात पालकांमध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
करमाळा शहरात गणित, इंग्रजी व सायन्स अशा विषयाचे अनेक क्लास आहेत. हे क्लास पहाटे साडेपाच-सहा वाजल्यापासून चालू असतात. ठराविक क्लास सोडलेतर अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा नाही. पाठीमागे एका क्लास चालकाने असेच चाळे केल्याने त्यांना गंभीर परिणामाला सामोरे जावे लागले होते. या घटना माहिती असूनही क्लास चालकांचे धाडस वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
वेताळपेठेत गणित विषयाच्या क्लास चालकाने एका मुलीची छेड काढली. हा प्रकार त्याने मुलीने पालकाला सांगितल्यानंतर त्या शिक्षकास पालकांनी बेदम मारहाण केली आहे. तसेच अन्य युवकांनीही त्यानंतर मारहाण केली आहे. त्यानंतरही तास चालूच होते. मराठा सकल समाजाच्या युवकांनी एकत्रित येऊन या घटनेचे गांभीर्य ओळखले व भविष्यात असे प्रकार होवू नयेत म्हणून त्यांनी करमाळा पोलीसांना अशा क्लास चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकास बोलावून घेऊन पोलीसांनी चांगलीच समज दिल्याचे समजते.
या मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस मिटू जगदाळे यांनी स्विकारले. यावेळी तहसीलदार समीर माने यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून संबंधितांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित क्लास चालकाच्या कृत्याचा करमाळा शहरातील पालकांनी निषेध केला असून, या शिक्षकास शहरात क्लासेस घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
शिक्षकाच्या या गैरकृत्याचा शिक्षकांवरील विश्वास कमी होण्यास मदत होत असून, असे कृत्य केल्याने सगळ्यांनाच गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
सदर प्रकरणी संबंधित शिक्षकांने असा कोणताही प्रकार झाला नाही असा खुलासा केला आहे. वर्गात विद्यार्थीनी मोबाईलवर चॅटींग करत होती.तीला वर्गात समज दिली, त्याचा राग येऊन तीने पालकाला चुकीची माहिती दिली. त्यांनी कोणतीही खातरजमा न करता माझ्यावर निष्कारण अन्याय केला आहे. वर्गातील अन्य विद्यार्थ्यांनींना विचारा असेही संबंधित शिक्षकांनी सांगितले आहे.