फसवणूक प्रकरणी पोलीसांचे चौकशीचे आश्वासन – अप्रुगा कांबळे यांचे उपोषण तहकुब..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जमीन खरेदीच्या नावाखाली मध्यस्थांनी २१ लाख रूपये घेऊन आपली फसवणूक केली आहे. या प्रकरणाची चौकशी होवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नागरीक सौ. अप्रुगा सिताराम कांबळे यांनी सुरू केलेले उपोषण पोलीसांच्या लेखी आश्वासनानंतर तहकूब केले आहे.
यात सौ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना रोशेवाडी येथील जमीन खरेदी प्रकरणात मध्यस्थ व्यक्तींनी २१ लाख रूपये घेऊन आपली फसवणूक केली आहे… असे लेखी निवेदन दिले होते. तसेच या प्रकरणी संबंधितावर कारवाई न झाल्यास ३ मार्च ला आपण उपोषण करू; असे कळविले होते.
त्यानूसार त्या उपोषणाला बसल्या होत्या. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एन. जगदाळे यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीअंती फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्यास कायदेशीररित्या पुढील कारवाई करण्यात येईल. दरम्यान आपण उपोषण मागे घ्यावे; असे लेखी पत्र दिले होते. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी उपोषण तुर्त तहकूब केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलीसांनी कळविले आहे.
