किरकोळ कारणावरून चौघांकडून दोघांना बेदम मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तुम्ही आमचे जागेतील रस्त्याने का गेला असे म्हणून चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार पोफळज (ता.करमाळा) येथे २ जानेवारी ला सायंकाळी पावणे सात वाजता घडला आहे. याप्रकरणी चौघांविरूध्द करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी कमल अंकुश काळे (वय 55)( रा.कांबळे वस्ती, पोफळज ता करमाळा) यांनी करमाळा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, आम्हाला पोफळज ता.करमाळा गावचे शिवारात 3 एकर शेत जमीन असून २ जानेवारी ला सायंकाळी पावणे सात वाजता मी व माझा मुलगा निकेश असे आमचे घराचे पाठीमागे थांबलेलो असताना आमचे घराचे शेजारी राहणारे तानाजी कांबळे, रोहन तानाजी कांबळे, पप्पी तानाजी कांबळे, उत्तम ज्ञानू कांबळे यांनी आमचे जवळ येऊन तुम्ही आमचे जागेतील रस्त्याने का गेला असे म्हणून मला व माझा मुलगा निकेश यास लाथाबुक्यांनी मारहाण करू लागले, त्यावेळी आम्ही त्यांना आम्हाला आमचे घरी जाणेसाठी दुसरा रस्ता नाही, असे म्हणत असताना त्यांनी पुन्हा आम्हाला शिवीगाळी करून तानाजी कांबळे याने तेथेच पडलेला दगड उचलून माझे डोक्यात मारून जखमी केले.
त्यानंतर त्या सर्वांनी आम्हाला तुम्ही आमचे जागेतील रस्त्याने आला तर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊन रोहन कांबळे याने आमचे घराचे पत्यावर दगड मारून तिथून निघून गेले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.