अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खुनाचा प्रयत्न – वांगीच्या बाप-लेकास मरेपर्यंत जन्मठेप

करमाळा (संदेश प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वांगी नं.२ (ता. करमाळा) येथील बाप-लेकास मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची व एक लाख रूपये दंडाची शिक्षा बार्शीतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ता.७ जानेवारी २०१९ रोजी ही घटना वांगी परिसरात घडली होती. या पिडीत मुलीच्या बहिणीने याबाबत पोलिसांत फिर्याद दाखल केला होती. यातील आरोपी दत्तात्रय किसन घोडके (वय ६०) रोहिदास दत्तात्रय घोडके (वय ४०, रा. वांगी नंबर २) यांच्या विरुद्ध गुन्हा सिध्द झाला आहे.

यात हकीकत अशी की, ता.७ जानेवारी २०१९ रोजी निर्भया शौचालयास जाते असे सांगून घरातून गेली होती ती बराचवेळ परत आली नाही. त्यानंतर तिचा शोध घेतल्यावर उसाच्या पिकात जखमी व बेशुद्ध अवस्थेत ती दिसून आली. तिच्या डोक्याजवळ रक्ताने माखलेले दोन दगड होते. अज्ञाताने लैंगिक अत्याचार केला असून तिला अज्ञात कारणावरून तिचे डोक्यास गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता असे फिर्यादीत म्हटले होते.
यानंतर सदर अल्पवयीन मुलीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. शुद्धीवर आल्या नंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. तपास अधिकारी श्री. तेलतुंबडे यांनी अधिक तपास करून आरोपींविरुद्ध बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्यात चौदा साक्षीदार तपासण्यात आले. अल्पवयीन पिडिता, फिर्यादी व चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.


