करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

करमाळा /संदेश प्रतिनिधी करमाळा, ता. 6 दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करमाळा नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नगरपरिषदेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येकी ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) मंजूर करण्यात आले आहे. नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .त्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे.

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्याने या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, या उद्देशाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा मोहिनी सावंत आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या या मागणीची पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक दखल घेतली.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड तसेच सर्व नगरसेवकांनी एकमताने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रत्येक कर्मचाऱ्याला ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनीही विशेष सहकार्य केले.नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होत घेतलेल्या या निर्णयामुळे यंदाची दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच अधिक गोड ठरणार आहे.
