युवतीवर अत्याचार – ४५ वर्षाच्या प्रौढावर गुन्हा दाखल…
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : १९ वर्षाच्या युवतीवर नात्यातील प्रौढाने अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी या प्रौढाच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हिसरे (ता.करमाळा) येथे १० जुन २०२४ ला सायंकाळी सात वाजता घडला आहे. यात १९ वर्षाच्या युवतीने फिर्याद दिली आहे.
त्यात तिने म्हटले आहे, की मी करमाळा येथे एफवायबीए च्या वर्गात शिक्षण घेत असून, १० जुन २०२४ ला सायंकाळी सात वाजता मी घरात एकटीच होते. त्यावेळी माझ्या नात्यातील विष्णू महादेव पवार (वय४५, रा. पिंपळनेर, ता. माढा) हा घरी आला व त्याने माझ्या इच्छे विरूध्द माझ्यावरती अत्याचार केला.
हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरातील लोकांना संपवून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे मी हा प्रकार कोणाला सांगितला नाही. त्यानंतर हाच आरोपी १४ ऑगस्टला मला कॉलेज परिसरात भेटला व त्याने तुझे फोटो माझ्याकडे आहेत… असे म्हणून शरीर संबंधासाठी ते फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यानंतर मी हा प्रकार घरी सांगितला. त्यानूसार २१ ऑगस्टला करमाळा पोलीसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.