करमाळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी - रक्तदान शिबिरात तब्बल १०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी – रक्तदान शिबिरात तब्बल १०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शहरातील सकल राजपूत समाज तथा महाराणा प्रताप सिंह जयंती उत्सव समिती करमाळा तालुका यांच्या वतीने महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त ८ व ९ जून रोजी ‘महाराणा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस झालेल्या या महोत्सवा दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

७ जून रोजी महाराणा प्रतापसिंह जयंतीच्या पार्श्वभूमीवर नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाकडून शहरातील मंगळवार पेठ येथील महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरात स्वच्छता करण्यात आली. यानंतर ८ जुन रोजी सकाळी १० वाजता शहरातील मान्यवर पत्रकार यांच्या हस्ते आणि शहरातील मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल १०९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिराला महीलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात सहभागी प्रत्येक रक्तदात्यास महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

शनिवारी डॉ. तुषार गायकवाड, डॉ. गादीया, डॉ. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महाराणा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली तर जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पत्रकार महेश चिवटे, किशोरकुमार शिंदे, महेश भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष ॲड. कमलाकर वीर, पै. सुधाकरकाका लावंड, नानासाहेब मोरे, दिपक चव्हाण, संतोष वारे, किरण बोकन, अरुण टांगडे आदी मान्यवर उपस्थित होते. रविवारी सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभुराजे जगताप, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, दत्ता फंड, भारत आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला जेष्ठ पत्रकार विवेक येवले, आण्णा काळे, विशाल घोलप, अविनाश जोशी, सिद्धार्थ वाघमारे यांच्यासह अरुणकाका जगताप, राजुशेठ शियाळ, रामभाऊ ढाणे यांसह शहर व तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

यानंतर ९ जुन रोजी सकाळी साडेआठ वाजता महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त मंगळवार पेठ येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला समाजातील प्रतिष्ठीतांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर यांनी आपल्या मनोगतात महाराणा प्रतापसिंह यांच्या त्याग आणि शौर्याची महती विशद केली तर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड यांनी महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत समितीच्या प्रत्येक उपक्रमास सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर शनिवार दि. ८ रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्यांतून लकी ड्रॉ द्वारे बक्षीसपात्र ८ रक्तदात्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील छत्रपती चौक येथेही सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी केली. महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त नवजवान सुतार तालीम येथे रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत आयोजित महाप्रसादाचा शहरातील सर्वांनी लाभ घेतला. जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्यांनाही अन्नदान करण्यात आले.

महाप्रसादानंतर सायंकाळी ५ ते १० यावेळेत महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेची शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजपूत समाजातील रणरागिनींनी तलवारबाजी, दांडपट्टा अशा विविध मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली. राजपुतान्यातील पराक्रमी स्त्रियांच्या वेशातील घोड्यावर स्वार युवती हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. याशिवाय नामवंत बँड पथकांनी या मिरवणुकीत आपली कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. सुप्रसिद्ध ‘माही डेकोरेटर्स’च्या नाविन्यपूर्ण सजावटीने या मिरवणुकीची शोभा वाढवली. महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त करमाळा शहरात दोन दिवस चालणाऱ्या या ‘महाराणा महोत्सवा’त शहर व तालुक्यातील राजपूत समाजासह सर्व समाज बांधवांनी सहभागी होत सामाजिक सलोख्याचे वातावरण अबाधित राखले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!