'आदिनाथ' साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार.. - Saptahik Sandesh

‘आदिनाथ’ साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करमाळा तालुक्यात येत असून येत्या 25 डिसेंबर रोजी येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते आदिनाथच्या मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) महेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत पुढे श्री.चिवटे यांनी सांगितले कि, मागील तीन वर्षांपासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेत होता. कामगार तसेच इतर देणी वाढल्याने कारखाना बंद करण्याची वेळ ही आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर आली होती. दरम्यानच्या काळात आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव करण्यात आला होता. सदर ठरावात पवार यांनी लक्ष झाली होती. परंतु एनसीडीसी बँकेने त्यात विरोध दर्शवल्याने कारखाना सुरू होण्याची प्रक्रिया थांबली होती. यावेळी करमाळा तालुक्यातील सभासदांनी बचाव कृती समितीची निर्मिती करून बारामतीच्या रोहित पवारांना कारखाना भाडेकरारराव देण्यासाठी विरोध केला.

त्यानंतर सत्ता बदल झाला व भाजपा व शिंदे सरकार सत्तेत आले. त्यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी सदरच्या कारखान्यात दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या हेतूने लक्ष घातले व कारखाना सुरू करण्यासाठी पावले उचलण्यासाठी सुरुवात केली. यावेळी सभासदांनी ही कारखाना हा भाडेतत्त्वावर न देता सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही भूमिका घेतल्याने अखेर कारखाना हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार बँकेने दिलेल्या शर्ती व अटीनुसार काही रक्कम भरून कारखाना सुरू करण्याची परवानगी मिळाली.

सदरची रक्कम जुळवाजुळी करताना सभासद व इतरांकडे सहकार्य मागितले जात होते. त्यामध्ये मोलाचा वाटा हा मंत्री तानाजी सावंत यांनी उचलला व मोठी रक्कम ही कारखान्याला चालू करण्यासाठी सहकार्य म्हणून देऊ केली. कारखान्यावर बागल गटाची सत्ता आहे. तर कारखाना सुरू करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनीही जोरदार ताकद लावली होती.

आदिनाथच्या संचालिका रश्मी बागल यांनी ठाम भूमिका घेऊन आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेऊन बारामती ग्रुपचा करार रद्द करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली, मंत्री तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रश्मी बागल व नारायण पाटील यांनी एकत्रित येऊन सहकार्य तत्त्वावर कारखाना चालू करण्यासाठी पुढाकार घेतला. या पार्श्वभूमीवर आता कारखाना सुरू होत आहे. मोळी टाकण्याचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठेवण्यात आला असून येत्या २५ डिसेंबरल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्यात येत आहेत.


शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजन करण्यात येत असून, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे, याप्रसंगी करमाळा तालुक्यातील रखडलेल्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक करमाळ्यात होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!