‘आदिनाथ’ गळीत हंगाम शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते २५ डिसेंबर ला होणार : चेअरमन धनंजय डोंगरे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ चा ऊस गळीत हंगाम शुभारंभ येत्या २५ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुंटूब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिलेल्या प्रेसनोट मध्ये म्हटले आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार नारायण (आबा) पाटील व बागल गटाच्या नेत्या व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई च्या संचालिका रश्मी (दिदी) बागल, हे उपस्थित राहणार आहेत.
याबाबत पुढे म्हटले आहे कि, कारखान्यामधील सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे यावर्षीचा सन २०२२-२३ चा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल. असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. २५ डिसेंबर रोजी होणा-या ऊस गळीत हंगाम शुभारंभासाठी तालुक्यातील व कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद यांनी उपस्थित रहावे असे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आवाहन केले आहे.


