करमाळ्यातील चांदगुडगल्ली भागात दुषित पाणीपुरवठा – नागरीकांचे आरोग्य धोक्यात..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : नेटके हॉस्पिटल येथून चांदगुडगल्लीत जाणारा सिमेंटचा रस्ता खचला आहे. तसेच या भागात गेल्या महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने गटारीतील दुषित पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.
शहरातील छत्रपती चौक व भवानीपेठ लगत चांदगुडगल्ली परिसर आहे. या ठिकाणी नेटके हॉस्पिटल पासून चांदगुड गल्लीत जाणारा सिमेंट रस्ता मोठ्या गाड्या जाऊन चिरून खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणेयेणे धोक्याचे आहे. तसेच या भागात गेल्या एक महिन्यापासून पाईप लाईन फुटल्याने गटारीतील पाणी पाईप लाईनमध्ये मिक्स होत आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना दुषित पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. या दुषित पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेकडे या भागातील नागरीकांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तात्काळ स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला नाहीतर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरीकांनी दिला आहे.