विजेचा शॉक लागून म्हशीचा जागीच मृत्यू - महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी - Saptahik Sandesh

विजेचा शॉक लागून म्हशीचा जागीच मृत्यू – महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याची मागणी

करमाळा (संदेश प्रतीनिधी) – करमाळा येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीचा चरताना वीज वहन करणाऱ्या तुटलेल्या तारेशी संपर्क आल्याने विजेचा जोरदार धक्का लागून म्हैस जागीच मृत्यू पावलेली आहे.  यामुळे सदर नुकसानीची महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने महावितरणकडे केलेली आहे.

नागेश बलभीम सूर्यवंशी (कसाब) (वय ३४) राहणार सावंत गल्ली, करमाळा यांनी या विषयी करमाळा वीज वितरण कार्यालयाकडे तक्रार केली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता माझ्या मालकीच्या सात म्हशी घेऊन मी बायपास रोड (पोथरे चौक)  जवळील सुनील लुनिया प्लॉटिंग येथे म्हशी चारण्यास घेऊन गेलो होतो.

सदर ठिकाणी महावितरनाची डीपी असून त्यावरून विजेची लाईन जाते. त्यादिवशी दुपारी एकच्या सुमारास आलेल्या वाऱ्याने विजवहन करणारी ही वायर तुटून जमिनीवर पडली. सात म्हशी पैकी एक म्हैस इथून जात असताना तिचा या विजेच्या तारेशी संपर्क आल्याने विजेचा शॉक बसून तिचा जागीच मृत्यू झाला. मी लगेच शेख वायरमनला फोन करून माहिती दिली. थोड्या वेळाने महावितरण कंपनीचे कर्मचारी परिस्थिती पाहण्यासाठी आले होते. ही दूध देणारी म्हैस होती. तिच्या मृत्यूने माझे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. याची नुकसान भरपाई महावितरण कार्यालयाने द्यावी अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली.

यानंतर महावितरण कंपनीकडून पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये म्हशीच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट काढण्यात आला.  त्यामध्ये देखील म्हशीचा मृत्यू  विजेचा शॉक लागून झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तरी देखील महावितरण कडून अजून भरपाई मिळाली नसल्याचे माहिती शेतकरी नागेश सूर्यवंशी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!