रावगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची बिनविरोध निवड - Saptahik Sandesh

रावगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची बिनविरोध निवड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – काल (दि.२४) झालेल्या रावगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे.

रावगाव ग्रामपंचायत मध्ये बागल-पाटील युतीला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले होते. युतीचे सरपंच रोहिणी संदीप शेळके या ६०० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या होत्या. यानंतर उपसरपंच निवड होणे बाकी होते. सरपंच हे बागल गटाचे असून उपसरपंच हे पाटील गटाकडून निवडणे निश्चित झाले होते. बागल-पाटील दोन्ही गटाकडून ज्ञानेश्वर जाधव यांच्या निवडीला पाठिंबा देण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.


या निवडीनंतर, “जनतेच्या विश्वासाला मी पात्र राहून, समंजसपणे , पदाला महत्व न देता सरपंचांसोबत रावगावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहील” असे मत नवनिर्वाचित उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थितांनी नूतन उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रावगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!