कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर टांगती तलवार – प्रशासकीय अधिकारी करतात मनमानी
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.28) : कोरोनाच्या कालावधीत ज्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस सेवा करून प्रशासनाला मदत केली.आता कोरोना संपल्यावर प्रशासनाला त्यांचा विसर पडला असून कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांना कमी करून नवीन भरती करण्याचा घाट घातला आहे. यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आंदोलनाचे शस्त्र उचलणार आहेत.
.
सन 2019 पासून जनसेवा हीच ईश्वरसेवा यानूसार कार्यरत असलेले कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची पदे प्रत्यक्षात कार्यरत असूनदेखील ती पदे रिक्त दाखविली व त्या जागी नवीन नुकतेच पास झालेले एम.बी.बी.एस. मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांची चूकीच्या माहितीच्या आधारावर नियमबाह्य सरळसेवा ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवून व सध्या कार्यरत असलेल्या व सेवा देणेची इच्छा असणा-या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करून अन्याय केला जात आहे.
चूकीच्या माहितीच्या आधारे दिशाभूल करून एकाच कामासाठी कंत्राटी अधिका-यांपेक्षा जास्त पगाराचे नियोजन करून नवीन बाॅन्डेड मेडिकल ऑफिसर ची पदभरती चालू केली आहे. सदर भरती न थांबविल्यास कंत्राटी वैद्यकीय अधिका-यांच्या निवेदन व विनंतीचा विचार न केल्यामुळे आंदोलनाचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन भरती थांबवणेकरीता आणि 2019 पासून कार्यरत असलेले कंत्राटी वैद्यकीय अधिका-यांची कार्यमुक्ती करू नये यासाठी दूरध्वनी वरून सुचना करूनही सचिवांनी ही प्रक्रिया थांबवली नाही. यामुळे संबधितांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे.