कमलाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद - तज्ञांचे मार्गदर्शन व विविध कृषी विषयक स्टॉल्सचा समावेश - Saptahik Sandesh

कमलाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद – तज्ञांचे मार्गदर्शन व विविध कृषी विषयक स्टॉल्सचा समावेश

करमाळा (दि.२९) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून कृषी योद्धा शेतकरी गट फिसरे, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी करमाळा व कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनी यांच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर रोजी अथर्व मंगल कार्यालय करमाळा या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. याचबरोबर निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर येथे विविध प्रकारच्या वस्तूंचे कृषी संदर्भातील विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाला करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

यावेळी व्यासपीठावर कळस कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे, कपिल चाचक, राहुल रसाळ, तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पाणी फाउंडेशन चे रवींद्र खोमणे, विभागीय समन्वयक संतोष शिंनगारे, सुखदेव भोसले, विक्रम फाटक,उमेद चे योगेश जगताप,प्रा.लक्ष्मण राख आदी उपस्थित होते.

१५ ते २० देशांतून भ्रमंती करून ज्ञानसंग्रह करणारे राहुल रसाळ आणि गेल्या ५० वर्षापासून केळी क्षेत्रामध्ये काम करणारे जाचक कुटुंबीय ही ज्ञानाचे विद्यापीठे असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हेच ज्ञानाचे दालन खुले करण्यासाठी आज राहुल रसाळ आणि कपिल जाचक यांना कमलाई कृषी प्रदर्शन मध्ये निमंत्रित केले असल्याचे प्रतिपादन पाणी फाउंडेशन चे मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ यांनी उद्घघाटनप्रसंगी केले.

या कृषी प्रदर्शनामध्ये पुढील महिला शेतकरी गटांचा समावेश होता

  • १.महालक्ष्मी महिला शेतकरी गट साडे
  • २.अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव
  • ३.संघर्ष महिला शेतकरी गट कोर्टी
  • ४.जिजाऊ महिला शेतकरी गट फिसरे
  • ५. जिजाऊंच्या लेकी महिला शेतकरी गट सरपडोह
  • ६. मदार महिला शेतकरी गट घोटी
  • ७.कुटुंब महिला शेतकरी गट कुंभारगाव
  • ८. क्रांती ज्योती महिला शेतकरी गट शेलगाव (क)
  • ९. राजमाता महिला शेतकरी गट वीट
  • १०.कृषी क्रांती महिला शेतकरी गट हिसरे

चेंज मेकर पुरस्कार देऊन तालुक्यातील १० महिला गटांचा व विक्रीम उत्पन्न घेणाऱ्या २ शेतकऱ्यांचा झाला सन्मान

  • १.महालक्ष्मी महिला शेतकरी गट साडे
  • २.अन्नपूर्णा महिला शेतकरी गट पोटेगाव
  • ३.संघर्ष महिला शेतकरी गट कोर्टी
  • ४.जिजाऊ महिला शेतकरी गट फिसरे
  • ५. जिजाऊंच्या लेकी महिला शेतकरी गट सरपडोह
  • ६. मदार महिला शेतकरी गट घोटी
  • ७.कुटुंब महिला शेतकरी गट कुंभारगाव
  • ८. क्रांती ज्योती महिला शेतकरी गट शेलगाव (क)
  • ९. राजमाता महिला शेतकरी गट वीट
  • १०.कृषी क्रांती महिला शेतकरी गट हिसरे

वैयक्तिक पुरस्कार

  • १. राहुल राऊत (कुंभारगाव) एकरी तुर 18.20 क्विंटल
  • २. अक्षय शेंडे ( घोटी) एकरी मका 45 क्विंटल

विशेष आकर्षण म्हणून महिलांसाठी ‘लाडकी बहीण लकी ड्रॉ’ असून विजेत्या महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात आली.

  • शिलाई मशीन चे बक्षीस मंजुळा जगताप (पाडळी) यांना मिळाले.
  • फवारणी पंप रेणुका जाधव (कुंभारगाव) व मनीषा बोराडे (केडगाव) यांना मिळाले.

या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे सुमारे 33 स्टॉल लावण्यात आले होते  यावेळी प्रदर्शनाला आलेल्या लोकांना पाहायला मिळाले.

  • फळबाग रोपांचे स्टॉल :  जी ९- केळी टिशू कल्चर, डाळिंब, आंबा, एक्झॉटिक भाज्या व फळांची रोपे, हायटेक नर्सरी,
  • सेंद्रिय शेती व उत्पादने:  गांडूळ खत, बायोगॅस, माती परीक्षण, गावरान सेंद्रिय बियाणे- भाजीपाला,
  • अद्ययावत तंत्रज्ञान व स्मार्ट शेती : हवामान संच, सोलर पंप, फवारणी ड्रोन, ठिबक संच- उपकरणे, बजाज ऑटो, शेततळे कागद, शेडनेट हरितगृह,
  • पशुधन: पशुखाद्य, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय, विविध प्रजातीचे देश विदेशातील डॉग, रेडा,गाय-म्हैस बैलाच्या विविध जाती, कोंबड्यांच्या जाती, घोडा, शेळी, आदी प्राणी, पक्षी
  • शेती विषयक संस्था : कृषि विभाग, गट शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि उद्योग व लघु उद्योगासाठी कर्ज बँक हे स्टॉल उपलब्ध होते.
  • खाद्यपदार्थ : लोणचे, कुरडई,पापड, मसाले, चटणी, घाण्याचे तेल, आदी गृहोद्योग पदार्थांचे स्टॉल.
  • वधू-वर सूचक – वधू-वर सूचक मंडळाचे देखील स्टॉल उपलब्ध होते.

यावेळी बोलताना कपिल जाचक म्हणाले की, जळगाव पाठोपाठ करमाळा तालुका हा आता केळीचा समुद्र बनला आहे नव्हे तर तो एक्सपोर्ट चा समुद्र बनलेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक केळी एक्सपोर्ट होण्याच्या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले पाहिजे. पारंपरिक पद्धतीने केळी लागवड न करता ती जोड ओळ या पद्धतीने केली पाहिजे त्याचा फायदा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी होतोच त्याचबरोबर अंतर मशागत करणेही सोपे जाते. केळी हे पीक सूर्यप्रकाशाचे भुकेलेले असते त्यामुळे लागवड ही नेहमी उत्तर दक्षिण याच पद्धतीने केली पाहिजे. केळीच्या शेतामध्ये कसलाही काडी कचरा न ठेवता तो बाहेर काढून आपण त्याचे खत तयार केले पाहिजे. या साध्या साध्या गोष्टींचे आपण पालन करत गेलो तर केळी निर्यात करणे अजिबात अशक्य नाही. त्याचबरोबर केळीसाठी जे अन्नघटक आवश्यक आहे त्याची मात्रा नियमितपणे ड्रेंचिंग च्या माध्यमातून गेली पाहिजे. वेगवेगळ्या कंपन्यांचे फसवे खते आणि औषधे वापरून कर्जाचा बोजा वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांनी वेळ आणि काळ पाहून त्या त्या वेळेला आवश्यक ती पाणी आणि खतांची मात्रा दिली पाहिजे असे केल्यास शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्चही कमी होईल आणि केळी निर्यात करणे ही सहज शक्य होईल.अवाच्या सव्वा केळीच्या घडाची लांबी वाढवली आणि साईज वाढवली म्हणजे तो मला एक्स्पोर्ट होतो हा गैरसमज आहे. एकरी जास्तीत जास्त 40 टनापर्यंत उतार एक्सपोर्ट साठी चालतो व केळीच्या घडाचे वजन 27 ते 30 किलो या दरम्यान असले पाहिजे. केळीच्या घडाला जास्तीत जास्त ९ फण्या आल्या पाहिजेत किंवा आपण त्या राखल्या पाहिजेत. एवढं मजबूत नियोजन केल्यास केळी निर्यातीत करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हात आजच्या घडीला तरी कोणीच धरू शकणार नाही असा ठाम आशावाद त्यांनी व्यक्त केला.

डाळिंब या फळ पिकाविषयी मार्गदर्शन करताना राहुल रसाळ म्हणाले की गेले २० वर्षापासून डाळिंब या पिकांची लागवड आम्ही सातत्याने करत आहोत. हे करत असताना यामध्ये आतापर्यंत कधीही फेल गेलेलो नाही,याचे प्रमुख कारण म्हणजे या पिकाला खत आणि पाणी देण्याच्या वेळा व फवारणी करण्याची वेळही आम्ही काटेकोरपणे पळत आलेलो आहोत. फवारणीसाठी जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये क्षार नसले पाहिजेत जर त्या पाण्यामध्ये अधिक क्षार असतील तर औषधाची मात्रा लागू होत नाही. फवारणी करत असताना तापमान ४० पेक्षा अधिक असेल तर आपल्या फवारणीतील ५०% खत हे बाष्पीभवन द्वारे उडून जाते. त्यामुळे फवारणीची ही वेळ आपण योग्य निवडली पाहिजे.शेतकऱ्यांकडे आधुनिक काळात शेती करत असताना हायड्रोमीटर ,टीडीएस मीटर हे मीटर असलेच पाहिजेत कारण आपण पिकांसाठी जी महागडी खते आणि औषधे वापरत असतो त्यातील ५०% वायाला जाणारा खर्च हे दोन मीटर वाचवू शकतात.

उद्घाटन पर मार्गदर्शन करताना कळस कृषी प्रदर्शनाचे प्रमुख सागर वाकचौरे म्हणाले की पहिल्याच वर्षी कमलाई कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुढील वर्षी प्रात्यक्षिकयुक्त कृषी प्रदर्शन भरवावे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये अधिकची भर पडेल.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर जिल्हा विभागीय समन्वयक सत्यवान देशमुख यांनी केले तर आभार कुंभारगाव ऍग्रो चे महेंद्र देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुजाता भोर यांनी केले.

Video सौजन्य : Prime News Solapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!