करमाळ्याच्या शुभांगी पोटे यांनी मारली बाजी – जोशी, मंजुळे पाठोपाठ मिळविले UPSC परीक्षेत यश

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आय.ए.एस. परीक्षेचा आजच निकाल जाहीर झाला असून या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यातील शुभांगी सुदर्शन केकान/ सौ. शुभांगी ओंकार पोटे या युवतीनेही बाजी मारली असून घर, संसार सांभाळत असताना करमाळा तालुक्यातुन याआधी यश मिळविलेले अजित जोशी, बालाजी मंजुळे यांच्या पाठोपाठ आय.ए.एस परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे.

शुभांगी या नुकतेच पोंधवडी शाळेतून सेवानिवृत्त झालेले सुदर्शन केकान या शिक्षकाच्या कन्या आहेत. वंजारवाडी (ता. करमाळा) हे त्यांचे मुळ गाव आहे. त्यांचा विवाह २० डिसेंबर २०१५ ला शेलगाव (वांगी) येथील सध्या बारामती येथे राहत असलेल्या ओंकार पोटे यांच्याबरोबर झाला. श्री. पोटे हे स्टेट बँकेत मॅनेजर असून सध्या अहमदनगर येथील मुख्य शाखेत कार्यरत आहेत. शुभांगी यांनी लग्नानंतर सन २०१६ ला बी. डी. एस. ची पदवी मिळवली आहे. त्यानंतर सन २०१६ ते २०२० पर्यंत त्यांनी बारामती येथे दंतचिकित्सक म्हणून स्वत:चा व्यवसाय केला आहे. त्यांना शिवम नावाचा सहा वर्षाचा मुलगाही आहे.
शुभांगी केकान यांनी मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, वंजारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सयाजीराजे ओंभासे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी अभिनंदन केले आहे.
स्वत:चा व्यवसाय व परिवार सांभाळत असताना युपीएससीचे स्वप्नं पाहणे ही गोष्ट अशक्यप्राय आहे. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता स्वत: घरातील काम करत त्यांनी विचारपूर्वक अभ्यास केला आणि पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. पती ओंकार पोटे यांचे त्यांना मार्गदर्शन व पाठबळ मिळाले. तसेच सासू व सासरे यांनीही त्यांना याकामी मदत केली. दुर्दैवाने युपीएससीच्या परीक्षेच्या कालावधीत त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले. अशाही दुःखद स्थितीत त्यांनी परिस्थितीवर मात करत परीक्षा दिली व त्यात यश मिळवले ही बाब विशेष आहे. कोविडच्या कालावधीत त्यांनी स्वत:चा व्यवसाय थांबवून युपीएससी वरती लक्ष केंद्रित केले व त्या या परीक्षेत ५३० वी रँक मिळवून यश हासिल केले आहे.
