कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील सन १९९३-९४ या शैक्षणिक वर्षातील इ.१० वी (अ, ब आणि क) या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन १८ नोव्हेंबर रोजी पार पडले. या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनात १९९३-९४ सालातील इ. १० वी (अ, ब आणि क) मधील ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आजी- माजी ३० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य “तीस वर्षांनंतर शाळेस वंदन, माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन” असे होते. तसेच या कार्यक्रमाचे घोषवाक्य (टॅगलाईन) “माझी शाळा, माझा अभिमान” असे होते. सर्वप्रथम गुरुजन व माजी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम स्थळी दिमाखदार स्वागत करण्यात आले. त्या नंतर सर्वांचे मराठी फेटा बांधून एकत्रित छायाचित्र घेण्यात आले. शाळा तसेच समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या स्नेहसंमेलनास आलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये सगळे जीवनात स्थिरस्थावर आहेत तसेच चांगल्या पदावर कार्य करत आहेत, त्यातील काहींनी संशोधक, इंजिनिअर,पोलीस, शिक्षक, शिक्षिका, रेल्वे कर्मचारी, गृहिणी, व्यापारी व उद्योगपती म्हणून आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व आजी-माजी शिक्षकांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. त्यांनतर दिवंगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनतर उपस्थित सर्व शिक्षकांचे सत्कार उपस्थित सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी परिचय सांगून आप-आपले मनोगत व्यक्त केले. यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि सगळे गतकालीन आठवणीत हरवून गेले. या कार्यक्रम प्रसंगी, माजी मुख्याध्यापक श्री. बागल सर, श्री. कवडे सर, श्री. बोबे सर, श्री. वीर सर, श्री. काटूळे सर, श्री. जाधवर सर तसेच सध्या शाळेवर शिक्षक असणारे श्री. भस्मे सर व श्री. अंकुशखाने सर तसेच सर्व आजी-माजी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ माजी शिक्षक श्री. फंड सर व श्री. इंगळे सर देखील आवर्जून उपस्थित होते.
या प्रसंगी, अभियंता व संशोधक श्री. सत्यशोधन पाटील यांचा मेडिकल क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरीव कामगिरी केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अभियंता श्री. शितल गांधी, शिक्षक व प्रभारी केंद्रप्रमुख राहीलेले श्री. संतोष पोतदार तसेच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात महत्वाची भूमिका पार पाडल्याबद्दल सौ. सुषमा ओहोळ- कांबळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.तसेच माजी विद्यार्थीनी व सध्या शिक्षिका असलेली सौ. सारीका बोबे-मुसळे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, सूर-ताल विद्यालय, करमाळा येथील चिमूकल्यांनी भजन व “महाराष्ट्र गीत” सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढवली. समारोप प्रसंगी, शारीरिक शिक्षणाचे माजी-शिक्षक श्री. सारोळकर सर यांनी सर्वांना उभे राहण्यास व राष्ट्रगीतासाठी “सावधान” अशी आज्ञा केली. त्यानंतर समूह राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
कल्पक प्रस्तावना व निमंत्रण पत्रिका, घोषवाक्य, स्वागत कमान व मंचावरील लक्षवेधक फलक, आकर्षक व सर्वांना उपयोगी पडेल अशी भेटवस्तू, विविध रंगाने भरलेली रांगोळी, देखणी सजावट व शाळेच्या आवारात केलेले वृक्षारोपण व भव्य आयोजन अशा परिपूर्ण नियोजनामुळे कार्यक्रमाला शोभा आली.
या स्नेहसंमेलनास वरील उल्लेख केलेल्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी व्यतिरिक्त महादेव कदम, किरण शिंदे, सुनिल जाधव, चक्रधर वारे, दिलीप जाधव, संतोष गायकवाड, महादेव लोंढे,वैजयंती पवार-भोसले, सीमा डवरे-भुसारे, स्वाती केसकर, योगिता इंगळे- व्हटकर, शुभांगी शिंदे-बोराटे, अलका शेगडे-ढेरे, अरिफा मुलानी- बेग यांची उपस्थिती होती.
अशा या अनोख्या व दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सत्यशोधन पाटील व सुजाता पवार-भोरे यांनी केले, तर संतोष पोतदार यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सुषमा ओहोळ-कांबळे, जीवन बरीदे, योगेश चुंबळकर, संतोष पांडकर, श्री. अमजद शेख तसेच सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व शाळेचे सध्याचे प्राचार्य श्री. जाधव सर, शिक्षक श्री. तनपूरे सर, श्री. शिंदे सर व श्री. महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले.