अतिवृष्टीमुळे बाधित केळी पिकांसह सर्व पिकांचे पंचनामे सरसकट करावे – राजेरावरंभा शेतकरी गटाचे निवेदन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुक्यात ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीच सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे, सध्या कृषी विभागाकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत परंतु त्यामध्ये केळी पिकाचा समावेश केलेला नाही, म्हणून या संदर्भात राजे रावरंभा शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांना केळी पिकांसह सर्व पिकांचे पंचनामे सरसकट करणे संदर्भात निवेदन दिलेले आहे.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीने बाधित असलेल्या पिकांचे सध्या पंचनामे सुरू आहे. परंतु या पंचनाम्यामध्ये 1 ते सव्वा महिना पर्यंत वय असलेल्या केळी बागांचे पंचनामे केले जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व केळी बागांना पाणी लागल्यामुळे सर्रास केळी पिकांची मुळकुज झालेली आहे .त्यामुळे बागेमध्ये करपा, शिगा टोका, तांबोरा, गडावरील पिटिंग रोग व बुरशीजन्य रोग इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला आहे. अति पावसामुळे तालुक्यातील निर्यातक्षम केळी आत्ता कवडीमोल दराने द्यावी लागणार आहे .प्रत्यक्षात पावसामुळे केळी पिकाचे 50 ते 90 टक्के पर्यंत नुकसान झालेले आहे.
तरी तालुक्यातील सर्व केळी बागांचे पंचनामे सरसकट करून केळी उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय द्यावा व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे. या निवेदनाच्या प्रती प्रांत आधिकारी यांचेसह तहसीलदार करमाळा व तालुका कृषी अधिकारी करमाळा यांना दिलेल्या आहेत.
केळी हे खूप खर्चिक व संवेदनशील पीक आहे. या पिकाला सर्व गोष्टी प्रमाणातच लागतात. आज करमाळा तालुक्यातील केळी ही जागतिक बाजारपेठेमध्ये आपला वेगळेपणाचा ठसा टिकवून आहे. परंतु निर्यातक्षम दर्जाची केळी आणण्यासाठी तालुक्यातील शेतकरी एकरी 70 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत खर्च करत असतो .यावर्षी अतिवृष्टीमुळे फवारणीचा खर्च अधिक वाढणार आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे .शासनाने केळी पिकांसह सर्व पिकांचे पंचनामे सरसकट केले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.
डॉ.विकास वीर, अध्यक्ष, राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. करमाळा

