मकाईच्या ऊस बिलासाठी १८ सप्टेंबरला साखर आयुक्तालया समोर बेमुदत आंदोलन करणार - प्रा. रामदास झोळ - Saptahik Sandesh

मकाईच्या ऊस बिलासाठी १८ सप्टेंबरला साखर आयुक्तालया समोर बेमुदत आंदोलन करणार – प्रा. रामदास झोळ

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिले न मिळाल्यामुळे ८ सप्टेंबर रोजी बेमुदत हलगी नाद धरणे आंदोलनाचे आयोजन साखर आयुक्त पुणे येथे करण्यात आले होते. परंतु मराठा समाजाच्या आरक्षणामुळे सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.मराठा समाजाचे समर्थन करून पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ऊस बिल मिळण्यासाठी बेमुदत हलगीनाद धरणे आंदोलन येत्या 18 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त पुणे होणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी दिली.

याबाबतचे निवेदन साखर आयुक्त पुणे सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, कार्यकारी संचालक मकाई कारखाना, तहसीलदार यांना देण्यात आले आहे.सदर निवेदनात असे म्हटले आहे की मकाई सहकारी साखर कारखान्याने वारंवार पत्र देऊन सूचना देऊन शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नाही.या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे मोठे सावट शेतकऱ्यावर उभे राहिले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सावकाराकडून कर्ज काढण्याची पाळी सर्वसामान्य शेतकऱ्यावर आली असून हा मुलांचे शिक्षण ,लग्न, आरोग्य याचा प्रश्न गंभीर बनला असून शेतकऱ्यांमध्ये मकाई कारखान्याविषयी प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याचे ऊस बिल न दिल्यास मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे आता शेवट आरपारची लढाई म्हणून 18 सप्टेंबर रोजी साखर आयुक्त पुणे येथे भव्य हलगीनाद व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी सांगितले आहे. या निवेदनावर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ कामगार नेते दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अंगद देवकते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव मांढरे पाटील,सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पाटील देविदास गायकवाड ,सिद्धेश्वर शिंदे यांच्या सह्या आहेत. बेमुदत हलगी नाद धरणे आंदोलनास मकाई सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!