राजपूत महिला बचत गट ठरला कुटुंबांचा कणा-छोट्या बचतीतून महिलांचा स्वावलंबीपणाकडे प्रवास

करमाळा (दि.८): – सुतार गल्ली, करमाळा येथील राजपूत समाजातील गृहिणींनी पाच वर्षांपूर्वी एकत्र येत ‘राजपूत स्वयंसहायता बचत गट’ सुरू केला. अल्प बचतीच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य मिळवून या महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहत घरखर्चाला हातभार लावण्याचा प्रेरणादायक मार्ग शोधला आहे.

प्रत्येकी दरमहा ३०० रुपयांची बचत ठेवत २० महिलांनी या गटाची सुरुवात केली. गटातील गरजू महिलेला सुरुवातीला १३,५०० रुपये कर्ज देण्यात आले. त्यानंतर बचतीच्या वाढीप्रमाणे एकूण सुमारे १० लाख रुपयांपर्यंत कर्जवाटप करण्यात आले. दरमहा फक्त ३०० रुपयांची बचत करून प्रत्येकी १७,५०० रुपयांची बचत जमा झाली असून, कर्जावरील व्याजातून प्रत्येकी १६,४०० रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.

या रकमांचा उपयोग महिलांनी वैयक्तिक गरजांसह पतीच्या व्यवसायाला मदत करण्यासाठी केला. याच गटातील अश्विनी सोमचंद्र परदेशी यांनी चायनीज फूड सेंटर, भावना ऋषिकेश परदेशी यांनी ‘चेतना मेक ओव्हर’ नावाचे ब्युटी पार्लर तर उर्मिला सुनील परदेशी यांनी शेवई मशीनच्या माध्यमातून गृहउद्योग सुरू केला.
गटातील सर्व महिलांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली. आमच्या बचत गटाच्या माध्यमातून समाजातील महिलांनी आर्थिक मदतीसह महिन्यातून एकदा एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा अनुभवही घेता आला. या बचत गटामुळे छोट्या बचतीचे महत्त्व सर्वांना कळाले असून लवकरच आम्ही नवीन बचत गटाची सुरुवात करणार आहोत.
● वंदना परदेशी, सचिव,राजपूत महिला बचत गट करमाळा.
स्वावलंबनाची प्रेरणा –
“बचत गटाच्या मदतीने ‘चेतना मेक ओव्हर’ हे माझं स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करता आलं. यामुळे चांगली रोजगार संधी मिळाली असून इतर महिलांनाही स्वावलंबनासाठी प्रेरणा मिळते आहे.”● भावना परदेशी, चेतना मेक ओव्हर




