महात्मा फुले समाजसेवा संस्थेच्या पुढाकाराने ११ बाल कामगारांची सुटका
करमाळा (दि.३०) – करमाळा येथील महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेच्या पुढाकाराने धोकादायक स्थितीत काम करण्याच्या ठिकाणाहून सोलापूर येथील ११ बाल कामगारांची सुटका करण्यात आली.
महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेद्वारे सोलापूर जिल्ह्यात मुलांना न्याय मिळवून देणे या प्रकल्पांतर्गत बालकामगार मुक्त जिल्हा व बालविवाह मुक्त जिल्हा हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोलापूर शहरांमध्ये पाहणी केली असता सात रस्ता व पार्क चौक चौपाटी भागामध्ये विविध ठिकाणी बालकामगार आढळून आले याबाबतची तक्रार महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेकडून जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय कामगार आयुक्त कार्यालय व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आली होती त्यानुसार दिनांक २७ सप्टेंबर रोजी महिला व बाल विकास अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय सदर बाजार पोलिस स्टेशन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन व महात्मा फुले समाज सेवा मंडळ करमाळा यांनी संयुक्तिकरित्या सोलापूर चौपाटी या भागामध्ये धाड टाकून 11 बाल कामगारांना धोकादायक स्थितीत काम करताना ताब्यात घेऊन बालकल्याण समिती सोलापूर समोर हजर करण्यात आले.
सदर कारवाईसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करण्यात आली. त्यामध्ये पोलीस निरीक्षक महादेव राऊत व त्यांची टीम चाईल्ड हेल्पलाइन चे समन्वयक आनंद ढेपे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, कामगार आयुक्त कार्यालयाकडून विलास गायकवाड व महात्मा फुले समाजसेवा मंडळ संस्थेचे जिल्हा प्रकल्प समन्वयक रजनीगंधा गायकवाड तालुका प्रकल्प समन्वयक सुजाता कांबळे व सीमा कांबळे यांनी सहभागी होऊन हे धाडसत्र यशस्वी पूर्ण केले. बालकामगारांची सुटका झाल्यानंतर त्यांची नोंद सदर बाजार पोलीस स्टेशन व फौजदार चावडी पोलीस स्टेशनला डायरी नोंद करण्यात आली.
बालकामगार अपराधा करता भारतीय दंड संहितेच्या 1860 च्या धारा 370 – 374 नुसार शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
बाल श्रम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांकडून कारखान्यांमध्ये व हॉटेलमध्ये काम करून घेणे गुन्हा आहे. जर कोणी 14 वर्षे च्या आतील व 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना धोक्याच्या ठिकाणी काम करून घेत असेल तर एक ते सहा महिन्यांचा कारावास व 20,000 ते 50,000 रुपये दंड होऊ शकतो.
बाल कामगार मुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत. या धाडसत्रानंतर समाजातील जागरूक नागरिकांनी बालकामगारांविषयी सहानुभूतीपूर्वक आचरण केले पाहिजे व जास्तीत जास्त बालकामगार धोकादायक ठिकाणी कामातून मुक्त झाले पाहिजे. याकरता समाजातील जागरूक नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी त्वरित माहिती देऊन समाजाप्रती असलेली जबाबदारी दाखवावी अशी विनंती महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे.