कोरेगाव भीमा येथे आलेल्या अनुयायींना करमाळ्यातील तरुणांनी केले मोफत अन्नदान
करमाळा : १ जानेवारीला शौर्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. येथे येणाऱ्या आपल्या बांधवांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये हा विचार मनात ठेऊन करमाळा येथील आंबेडकरवादी चळवळीतील तरुणांनी एकत्र येऊन शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या जवळपास ५ हजार अनुयायींना मोफत अन्नदान केले आहे.
यासाठी करमाळा (karmala) येथून सुमारे ५० तरुण कोरेगाव भीमा येथे गेले होते.अन्नदान करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते तेथे गेले होते. तिथे त्यांनी अन्नदानाचा स्टॉल लावून अन्नाचे वाटप केले. यावर्षी प्रथमच हा उपक्रम या तरुणांनी राबवला असून दरवर्षी हा उपक्रम ते राबविणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.या उपक्रमाचे करमाळा परिसरातून कौतुक केले जात आहे.