स्वतःच राजकारण टिकवण्यासाठी आदिनाथ बंद पाडण्याचे पाप बागलांनी करू नये – महेश चिवटे

करमाळा(दि.१४): माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे पॅनल निवडून आले, तर संजय मामा कारखाना सक्षमपणे चालवतील व त्यांचा गट तालुक्यात मजबूत होईल यामुळे बागल गटाचे राजकारण संपुष्टात येईल या भीतीपोटी बागल कुटुंब आदिनाथ कारखाना आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात देण्यासाठी डावपेच आखत आहेत. मात्र यामध्ये करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहकाराचे मंदिर असलेले आदिनाथ सहकारी साखर कारखाना कायमस्वरूपी बंद पडेल असा दावा जिल्हाप्रमुख चिवटे यांनी केला आहे.

माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोटमध्ये ते म्हणाले की, स्वर्गीय दिगंबर बागल यांच्या काळात आदिनाथ कारखाना कर्जमुक्त झाला होता मात्र नंतर हा कारखाना प्रचंड आर्थिक संकटात कोणी आणला हे जनतेला माहित आहे. माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी सहा ते सात जागा देण्याचे कबूल केलेले असताना केवळ आपले कार्यकर्ते पदावर जाऊ नये
कार्यकर्ते पदावर गेले तर ते कायमस्वरूपी मामाच्या गटात जातील या भीतीपोटी कार्यकर्त्यांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसण्याचे काम रश्मी बागल यांनी केले आहे. दिग्विजय बागल हे विलासराव घुमरे व रश्मी बागल यांच्या हातातील कटपुतली झाले असून राजकीय निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नसल्यामुळे दिग्विजय बागल यांची सुद्धा भावी काळातील राजकारण अडचणीत येणार आहे.

दिग्विजय बागल हे सक्षम युवा नेतृत्व असून स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते दिग्विजय बागल यांना नेता म्हणून स्वीकारतात मात्र दिग्विजय बागल दीदी व सर यांच्या इशाऱ्यावर राजकीय निर्णय घेतात यामुळे त्यांचे राजकीय नुकसान होत आहे. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे, ऐकून घेणे हे नेत्यांचे काम असते. स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी त्यांच्या घरातीलच मंडळी त्याच्यावर काही निर्णय बळजबरीने लादत आहेत.

केवळ संजय मामा शिंदेच कारखाना चांगला चालवतील व आपली राजकीय खच्चीकरण होईल. वेळ पडली तर आदिनाथ कारखाना उद्ध्वस्त झाला तरी चालेल मात्र आपले राजकारण टिकले पाहिजे अशी भूमिका विलासराव घुमरे व रश्मी बागल घेत आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी टाकण्याचा प्रकार आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गट तट पक्ष जात धर्म न पाहता केवळ कारखाना चालवणारा व्यक्ती म्हणून शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या पॅनलला निवडून द्यावे असे आवाहन चिवटे यांनी केले आहे. आदिनाथ कारखाना निवडणुकीबाबतचा सविस्तर अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असून महायुतीच्या पॅनलला शिवसेनेचा भक्कम पाठिंबा आहे.


