सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर दुग्ध प्रक्रिया संघांनी अन्याय करु नये – शंभूराजे जगताप
करमाळा / संदेश प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर दुग्ध प्रक्रिया संघांनी अन्याय करु नये असे मत भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले.
याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्यातील इतर जिल्हयात दुधाचे दर जास्त असताना सोलापूर जिल्ह्यातील दुध संघांकडून मात्र गायीच्या दुधाला जास्तीत जास्त २६ रु दर दिला जात आहे . राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रु, पुण्यात ३१ रु दर दिला जात आहे. हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यावर अन्याय होत आहे, पशुखाद्ये व चाऱ्याचे दर मात्र अवाजवी आहेत. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. शेतकर्यांकडे चारा अपूरा आहे, पशुधन जगवणे गरजेचे आहे, त्यामुळे उत्पादन खर्च व उत्पन्न याचा मेळ बसण्यासाठी दुध संघांनी निव्वळ नफा न पाहता इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने दुधाला भाव दिला पाहीजे. या बाबतीत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर आपण आवाज उठवून, दुध संघांशी संपर्क साधून बळीराजाला न्याय मिळवून देवू अशी ग्वाही भाजपा जिल्हा युवा मोर्चा चे अध्यक्ष जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे.