ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सीना-कोळगाव प्रकल्प परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोळगाव धरणाचे संग्रहित छायाचित्र

करमाळा : सीना-कोळगाव उपसा सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रकल्प परिसरातील पाण्याचा उपसा करणाऱ्या विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाणी टंचाई शाखेने महावितरणला दिले आहेत. यामध्ये परंडा व करमाळा परिसरातील संबंधित विद्युत ट्रान्सफॉर्मरवरील वीजपुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाने 14 नोव्हेंबर 2026 रोजी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. सीना-कोळगाव प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार, प्रकल्पातील पाण्याचे नियोजन करून सिंचनासाठी आवश्यक आवर्तने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, करमाळा तालुक्यातील आवाटी, निमगाव ह, गौंडरे, कोळगाव आणि मिरगव्हाण या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी सुरू असलेल्या तीन तासांच्या वीजपुरवठ्याद्वारे काही ठिकाणी शेतीसाठीही पाणी उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या पाण्याच्या वापरावर परिणाम होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

यासंदर्भात सीना-कोळगाव प्रकल्पावरील वीजपुरवठा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंता, धाराशिव पाटबंधारे विभाग यांनी 19 ऑक्टोबर 2026 रोजी महावितरण कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे सीना-कोळगाव प्रकल्पातील पाण्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्यासाठी परंडा व करमाळा परिसरातील संबंधित विद्युत ट्रान्सफॉर्मरवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही महावितरणने करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

error: Content is protected !!