केम स्थानकाजवळ हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न फसला - Saptahik Sandesh

केम स्थानकाजवळ हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस लुटण्याचा प्रयत्न फसला

केम(प्रतिनिधी/ संजय जाधव) – रात्रीच्या सुमारास केम ते ढवळस रेल्वे स्थानका दरम्यान चोरट्याने लाल रंगाचे कापड दाखवून मुंबई-हैदराबाद एक्सप्रेस गाडी थांबवली. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला परंतु तो प्रयत्न फसला. ही घटना 15 जून रोजी रात्रीच्या सुमारास केम स्थानकाजवळ घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई-हैदराबाद गाडी क्रमांक 22732 ही गाडी केम येथून साडेनऊ च्या सुमारास ढवळसकडे निघाली होती. चोरट्याने रूळावर लाल रंगाचे कापड लावल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यानंतर चोरट्यांनी बोगी नं २ एस बर्थ मधील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खिडकीतून हात घालून जोरदार ओढले परंतू हे मंगळसूत्र रेल्वे डब्यात पडले. यानंतर महिलांनी आरडाओरडा सुरू केली. यावेळी रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस रेल्वे गाडी जवळ येताच चोरांनी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या बाबत रेल्वे सुरक्षा बलाचे उज्वल रहांग हाळे यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली व अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. याविषयी अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!