पत्नीला नांदावयास का पाठवत नाही म्हणून जावयाकडून सासऱ्यास मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : पत्नीला नांदावयास का पाठवत नाही या कारणावरून जावयाकडून सासरा व सासुस लाथाबुक्क्याने, दगडाने मारहाण केली आहे. हा प्रकार १४ जुलैला दुपारी दीडच्या सुमारास पोंधवडी येथे घडला आहे.
या प्रकरणी सौदागर यशवंत वाघ (रा. पोंधवडी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी मुलगी कोमल हिचा विवाह बिभिषण विलास मत्रे याच्याबरोबर झाला आहे. परंतु दोघांचेही पटत नसल्याने माझी मुलगी माहेरी असते.
तिला सासरी का पाठवत नाही, या कारणावरून १४ जुलैला दुपारी दीड वाजता मी शेळ्या चारत असताना बिभिषण मत्रे, देविदास मत्रे, पुष्पा मत्रे व सोनाली मत्रे (सर्व रा. पोंधवडी) हे आले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.