'मराठा समाजाला आरक्षण' मिळण्यासाठी तालुक्यातील ५० गावात नेत्यांना प्रवेश बंदी - करमाळा तहसीलमध्ये साखळी उपोषण सुरू.. - Saptahik Sandesh

‘मराठा समाजाला आरक्षण’ मिळण्यासाठी तालुक्यातील ५० गावात नेत्यांना प्रवेश बंदी – करमाळा तहसीलमध्ये साखळी उपोषण सुरू..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे; या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुका सकल मराठा समाज तर्फे येथील तहसील कार्यालयात २६ ऑक्टोबर पासून चक्री उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणाला मराठा समाज व अन्य समाजाचाही प्रचंड पाठींबा मिळत आहे. एवढेच नाहीतर तालुक्यातील ५० गावात राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना गावात प्रवेश बंदी आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखीच तीव्र बनले आहे. ‘चुलीत गेले नेते आणि पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष’, “मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही..!” असा नारा मराठा समाजाने दिला असून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना गावागावातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिले आहेत.

तसेच गावाबाहेर लक्षवेधी ठिकाणी आरक्षण नाहीतर मतदान नाही तसेच राजकीय पक्षांना व नेत्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात प्रवेश बंद..! असे आशयाचे फलक लावले आहेत. गावागावात, वडीवस्ती व शहरापर्यंत आंदोलन पेटले असून मराठा समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली आहे. आंदोलन कर्ते आंदोलनावर ठाम असल्याने सरकारचीही कोंडी झाली आहे.

करमाळा तालुक्यात या आरक्षणाच्या समर्थनार्थ तहसील कचेरीसमोर चक्री उपोषण सुरू आहे. दररोज ग्रामपंचायतीचे ठराव व निवेदने तहसीलदार यांना देण्यात येत आहेत. तालुक्यातील रजपुत समाज, धनगर समाज व मुस्लिम समाजाने या आरक्षण मागणीला पाठींबा दर्शविला आहे. पोथरे, बोरगाव, खडकेवाडी, जातेगाव, भालेवाडी, सरपडोह, आळजापूर, शेलगाव ( क ) श्रीदेवीचामाळ, सातोली, पोटेगाव, रोशेवाडी, वांगी नं. ३, भोसे, तरटगाव, पाडळी, देवळाली, खडकी, वांगी नं. २, वडगाव (द), हिवरे आदी ४० गावांनी राजकीय पक्षांना गावात प्रवेश बंदी केली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी अन्य समाजानेही पाठींबा दर्शविला आहे. तसेच करमाळा बसस्थानकात एसटी बसवर असलेल्या शासकीय जाहिरातीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चेहऱ्यावर काळे फासून जोडे मारो आंदोलन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!