जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला ‘थांबा’ मिळण्यासाठी धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे रेल्वे मंत्र्यांना निवेदन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांबण्याची मागणी केली आहे.
सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुणे येथे दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग व हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.
सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल. दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.