केमच्या नवदुर्गा वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष; कुंकू व्यवसायात भरारी - Saptahik Sandesh

केमच्या नवदुर्गा वंदना येवले यांच्या जीवनाचा संघर्ष; कुंकू व्यवसायात भरारी

केम (संजय जाधव). कुंकवासाठी प्रसिद्ध असलेल्या केम (ता. करमाळा) येथील श्रीमती वंदना येवले यांनी पतीचे छत्र हरपल्यानंतरही संघर्ष करत कुंकू व्यवसायात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भरारी घेतली आहे.

वंदना कल्याण डोंगरे यांचे बालपण तसेच इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण जामखेड (जि. अहिल्यानगर) येथे झाले. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांचा विवाह केम (ता. करमाळा) येथील प्रदीप मधुकर येवले यांच्याशी झाला. त्यांना अमृता आणि श्रेया या दोन मुली आहेत.

येवले घराण्याचा कुंकू कारखाना हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. घरचाच व्यवसाय असल्यामुळे घरकामासोबतच कारखान्यातील कामाची आणि व्यवसायाची आवड निर्माण झाली. सर्वसाधारणपणे व्यवसायात कितीही माणसे असली तरी काम कमी पडते, त्यामुळे त्या पतीला कारखान्याच्या कामात मदत करू लागल्या.

त्यांनी कुंकू, गुलाल, भंडारा इत्यादी पदार्थ कसे बनवायचे, हे प्रमाणबद्ध पद्धतीने शिकवले. रंग तयार करणे, दळणे, वाळवणे तसेच तयार मालाची प्रतवारी करणे, ही सर्व कामे त्यांनी शिकून घेतली. व्यवसायात अडीअडचणी येतच असतात. त्यामुळे कारखान्यात माल तयार करण्याचे कसब अवगत झाल्यानंतर त्या कारखान्यात लक्ष देऊ लागल्या. बाहेरगावच्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधणे, मालाची देवाणघेवाण करणे, पत्रव्यवहार आणि बँकेचे कामकाज ही कामे प्रदीप शेठ पाहू लागले.

व्यवसाय व्यवस्थित सुरू होता. मोठ्या मुलीचे एम.एस्सी. (फिजिक्स) पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आणि २०२० मध्ये तिचे लग्न झाले. धाकटी मुलगी श्रेया सध्या शिक्षण घेत आहे.

त्यानंतर त्यांच्या पतीला आजार झाला. अकलूज, पुणे इत्यादी ठिकाणी उपचार करण्याचा प्रयत्न केला. औषधोपचार आणि दवाखान्याचा खर्च वाढत होता. व्यवसायाकडेही दुर्लक्ष होत होते. तरीसुद्धा कारखान्यातील कामगारांच्या मदतीने जमेल तेवढे उत्पादन त्या करत होत्या. फोनवरून तसेच गावातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने मालाची देवाणघेवाण सुरू होती; मात्र उधारीची रक्कम वेळेवर वसूल होत नव्हती.

अशातच २०२२ मध्ये त्यांच्या पतीचे दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि समोर अनेक प्रश्न उभे राहिले. घरात कर्ता पुरुष नसल्यामुळे हा व्यवसाय सुरू ठेवण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. एक महिना दुःखात गेल्यानंतर नातेवाईक आणि भावकीतील लोकांशी विचारविनिमय करून त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

श्री उत्तरेश्वराच्या पावन भूमीत त्यांना गावातील कारखानदार, गावकरी, कामगार, कच्चा माल पुरवठा करणारे तसेच त्यांच्याकडून तयार माल घेणारे व्यापारी यांची खंबीर साथ मिळत आहे. एका महिलेने हा व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो; मात्र त्यावर मात करत त्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढे वाटचाल करत आहेत. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

error: Content is protected !!