पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पीएसआयसह तिघे निलंबित- सीआयडीमार्फत तपास सुरू - Saptahik Sandesh

पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी पीएसआयसह तिघे निलंबित- सीआयडीमार्फत तपास सुरू


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२८ : पोलीस कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. सांगवी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी एका पीएसआयसह दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते.
कृष्णा ज्ञानदेव मोहिते याच्याविरुद्ध त्याच्याच नातेवाईक असलेल्या महिलेने पोक्सो कायदा तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला 20 ऑक्टोबर ला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी मिळाली होती.

पोलीस कोठडीतील पहिल्याच दिवशी, २० ऑक्टोबर रोजी, कृष्णा मोहिते याने भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी प्रथम करमाळा येथील रुग्णालयात आणि पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २३ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. नातेवाईकानी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास गुप्तचर विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती असून, सीआयडीमार्फतही तपास सुरू आहे. या तपासादरम्यान संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने त्यादिवशी कार्यरत असणारे पीएसआय उघडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रणदिल आणि कादगे या तिघांना निलंबित करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिघांना निलंबित केले असल्याचे समजते. दरम्यान, कृष्णा मोहिते याच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती काय होती आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, हे सीआयडीच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!